पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तसेच आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या द्विसदस्यीय पथकाने रविवारी (दि. 11) महापालिका क्षेत्राला भेट दिली. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करून मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या चतु:सूत्रीचे पालन करण्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले.केंद्रीय पथकाचे सदस्य डॉ. साहिल दिवाण व डॉ. प्रवीण यांच्यासोबत या वेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले, तहसीलदार विजय तळेकर, उपायुक्त संजय शिंदे, सचिन पवार, विठ्ठल डाके, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, महापालिका वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांची उपस्थिती होती. केंद्र शासनाच्या या पथकाने कोविडच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोविड प्रतिबंधक सोयी-सुविधांचा तसेच कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडून जे नियोजन केले जाते, त्याचाही आढावा घेतला. पनवेल महानगरपालिका क्षेत्रफळ, वॉर्डची संख्या, येथील उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ऑनलाइन डेटा फिडिंग प्रणाली, उपलब्ध मनुष्यबळ या विषयीची माहिती घेवून या पथकाने पनवेल उपजिल्हा रुग्णालय, एमजीएम हॉस्पिटल, इंडिया बुल्स येथील विलगीकरण केंद्र, आजिवली प्राथमिक आरोग्य केंद्र, आरटीपीसीआर लॅब, ऑक्सिजन टँक, अतिदक्षता विभाग, लसीकरण केंद्र, लस भांडार शीतकक्ष या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून तेथील कामकाज पध्दतीचे निरीक्षण केले. पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी त्यांना संगणकीय सादरीकरणद्वारे याविषयी अधिक सविस्तर माहिती दिली. भेटीअंती या पथकाने कोविड-19च्या वाढत्या प्रादूर्भावाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, या चतु:सूत्रीचे नागरिकांनी कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन केले.