Breaking News

उमेदवारांमधील फरक ओळखून मतदान करा -आमदार प्रवीण दरेकर

नागोठणे : प्रतिनिधी : देशाच्या दृष्टीने ही लोकसभा निवडणूक फार महत्त्वपूर्ण आहे. सदाचार विरुद्ध भ्रष्टाचार, अशी ही निवडणूक असून मतदारांनी दोन उमेदवारांमधील फरक ओळखून मतदान करावे, असे आवाहन भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी (दि. 11) नागोठण्यातील नागरिकांना केले. शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, शिवसंग्रामच्या महायुतीची सभा गुरुवारी सायंकाळी येथील प्रभुआळीतील गांधी चौकात पार पडली, त्या वेळी आमदार दरेकर बोलत होते. ही निवडणूक एका प्रवृत्तीच्या विरोधात आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. या सभेला शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोर्‍हे, भाजपचे नेते माजी मंत्री रवीशेठ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, जिल्हा संपर्क नेते विलास चावरी, आरपीआयचे नेते जगदीश गायकवाड, भाजपचे नेते विष्णू पाटील, संजय कोनकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अमित घाग, आरपीआयचे अमोल इंगोले, चिंतामण कांबळे, संतोष गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, वैकुंठ पाटील, सुनील नाईक, रोहे पं. स. सदस्य संजय भोसले, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, शाखाप्रमुख कीर्तिकुमार कळस, रासपचे गणपत पानकर, सुप्रिया महाडिक, दीपिका गायकवाड, सोनम भोसले, सुनीता खाडे, युवा सेनेचे कार्तिक जैन, गणपत म्हात्रे, फातिमा सय्यद, संतोष लाड आदींसह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जलसंपदा खात्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला नसता, तर रायगडाची जनता आजही तहानलेली राहिलीच नसती. मुस्लिम समाज गीतेंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. जिल्ह्यातील काँग्रेस संपली असून राष्ट्रवादीची वळवळ थांबविण्याची वेळ आली आहे, असे आवाहन करताना आमदार दरेकर यांनी, सध्याच्या मित्रापासून आपण यापुढे सावध राहावे, असा सल्ला स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार धैर्यशील पाटील यांना आपल्या भाषणात दिला. नागोठणे खर्‍या अर्थाने माझी कर्मभूमी असून मंत्रिपदाच्या काळात प्रचंड अशी विकासकामे केली आहेत. जिल्ह्यातील काँग्रेस जागृत ठेवण्यासाठी विशेष लक्ष दिले होते, मात्र तीन निवडणुकांत मित्रपक्षाने माझी फसवणूकच केल्याने त्यात मला पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत माझ्या पेण मतदारसंघातून युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या पारड्यात जास्तीत जास्त मते पाडण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असून येथून त्यांना 50 हजाराची आघाडी मिळवून देणारच, असा विश्वास रवीशेठ पाटील यांनी व्यक्त केला. अनंत गीते रायगडाची शान असून नरेंद्र मोदी यांच्या हातातच देश सुरक्षित राहणार आहे व गीते सातव्यांदा खासदार म्हणून निवडून जाणार आहेत. रायगड जिल्ह्यात येणारे प्रकल्प रद्द करण्यात राष्ट्रवादीचे नेतेच आघाडीवर आहेत. रायगड आणि मावळ, बारामतीत घराणेशाही रुजत असून ती थांबविणे काळाची गरज बनली आहे, असे मत आमदार नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले. गोठण्यातील सभेचा तटकरे नेहमीच धसका घेत असतात. या मतदारसंघात अनंत गीते सर्वात जास्त मताधिक्य मिळालेले असेल, असा विश्वास व्यक्त करून किशोर जैन यांनी अनंत गीते यांच्यासाठी महायुतीतील सर्व जण झटून काम करीत असल्याचा दावा केला. जगदीश गायकवाड यांनीही महायुतीच विजयी होईल असा दावा केला. अमित घाग, सुनील नाईक, विष्णू पाटील, विलास चवरी यांचीही या सभेत भाषणे झाली. प्रास्ताविक आनंद लाड यांनी केले.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply