Breaking News

आशा स्वयंसेविकांना अतिरिक्त कामासाठी ठोक मानधन

पनवेल : प्रतिनिधी

राष्ट्रीय अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना कामावर आधारित मोबदल्याव्यतिरिक्त साथीच्या रोगांचा सर्व्हे व त्याअनुषंगिक कामासाठी अतिरिक्त ठोक मानधन देण्याचा निर्णय सोमवारी (दि. 9) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.

पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत झाली. पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यावर ग्रामीण आणि सिडको क्षेत्रासह महापालिका हद्दीत आलेल्या नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणे बंधनकारक असून, पावसाळा आणि वातावरणात होणार्‍या बदलांमुळे साथीचे रोग पसरू नयेत यासाठी सर्वेक्षण व त्यावर उपाययोजना करणे, तसेच शासनाच्या विविध योजना राबविण्याच्या कार्यात राष्ट्रीय अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या 96 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. त्यांना कामावर आधारित मोबदल्याव्यतिरिक्त साथीच्या रोगांचा सर्व्हे व त्याअनुषंगिक कामासाठी अतिरिक्त ठोक मानधन देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. त्यासाठी 11 लाख 52 हजार रुपये अतिरिक्त खर्चाला मंजुरी देण्यात आली.

महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. हा उत्सव विधायक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा करणे ही काळाची गरज असल्याने प्रदूषणाविषयी समाजात जागृती करणे, बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्त्रीभ्रूणहत्या असे प्रबोधन करणार्‍या गणेशोत्सव मंडळांसाठी सुखकर्ता पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी प्रथम क्रमांक 25 हजार रुपये, द्वितीय 21 हजार रु., तृतीय 15 हजार रु., प्रत्येकी दोन हजार 500 रुपयांची उत्तेजनार्थ 10 बक्षिसे व सर्वांना स्मृतिचिन्ह देण्याच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.

पूर्वाश्रमीच्या तोंडरे ग्रामपंचायतीत दिवाबत्तीच्या कामावर असलेल्या विश्वनाथ पाटील यांना कामावर असताना 7 मार्च 2019 रोजी अपघात झाला. त्यात ते 25 टक्के भाजले होते. त्यांच्या उपचारासाठी तीन लाख 46 हजार 512 रुपये खर्च आला. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने तो खर्च देण्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय धानसर, रोडपाली, रोडपाली (बौद्धवाडा) व कोयनाळेतील पायाभूत सुविधा पुरविण्याच्या निविदांनाही या वेळी मंजुरी देण्यात आली. 

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply