मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील दस्तुरी नाका ते तेलवडे गावादरम्यान असलेल्या मोरीच्या रुंदिकरणास तातडीने मंजुरी द्यावी; अन्यथा शनिवारी (दि. 26) दुपारी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तेलवडे ग्रामस्थांनी दिला आहे.
मुरूड शहरानजीक असणार्या दस्तुरी नाका ते तेलवडे गाव या दरम्यान मोरी बांधण्यात आली आहे. पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेले छोटेमोठे वृक्ष या मोरीत अडकतात. त्यामुळे पाणी तुंबून ते परिसरातील घरात पाणी शिरते. त्यामुळे पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना इतर ठिकाणी स्थलांतरीत व्हावे लागते. सदरची अरूंद मोरी तातडीने तोडण्यात येऊन तेथे सिमेंट काँक्रिटचा स्लॅब टाकून मोठी मोरी बांधून मिळावी, ही मागणी मंजूर होण्यासाठी शनिवारी दुपारी 3 वाजल्यापासून तेलवडे येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी मुरूड तहसीलदार, पोलीस ठाणे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदनाद्वारे दिला आहे.
मोरीच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आम्ही शनिवारी दुपारी रस्ता रोको आंदोलन करणार आहोत.
-कमरुद्दीन हालडे, प्रमुख आंदोलक, तेलवडे, ता. मुरूड