कर्जत तालुक्यातील घटना, शेतकर्याची न्यायालयात धाव
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील गावंडवाडी येथील शेतकर्याने धारा भरताना सातबारा पहिला असता स्वतःची जमीन दुसर्याच्या नावावर झाल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे या शेतकर्याने थेट न्यायालयात धाव घेतली असून, कर्जत न्यायालयाने या घटनेचा तपास करण्याचे आदेश नेरळ पोलिसांना दिले आहेत.
मुंबईच्या जवळ असल्याने कर्जत तालुक्यातील जमिनींना मागील काही काळात मोठ्या प्रमाणात मागणी सुरु झाली. जमिनीला असलेली मोठी मागणी आणि खरेदीदारांची वाढलेली गर्दी त्यामुळे जमीन व्यवहारात फसवणूक होण्याच्या घटनांतदेखील वाढ झाली आहे.असाच काहीसा प्रकार कर्जत तालुक्यातील खांडस जवळील गावंडवाडीत घडला आहे. नामदेव रामा वारघुडे हे त्यांच्या जमिनीचा (सर्वे न. 42/2) शेत सारा भरण्यासाठी बांगरवाडी येथील तलाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या जमिनीचा सातबारा मागितला असता, तलाठ्याने सांगितले की, ही मिळकत धवळ्या बाबू गावंडा यांच्या नावे झालेली आहे. त्यामुळे वारघुडे यांनी पुन्हा एकदा कागदपत्रे तपासून पहिली त्यावरून धवळ्या बाबू गावंडा व इतर नऊ इसमांनी संगनमताने खोटे कागदपत्रे तयार करुन सदरची जमीन त्यांच्या नावावर केल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नामदेव वारघुडे त्यांनी थेट न्यायालयाचे दार ठोठावले आहे. कर्जत येथील न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश नेरळ पोलीस ठाण्यास दिले आहेत. दरम्यान, नेरळ पोलीस ठाण्याने या प्रकरणी धवळ्या बाबू गावंडा व इतर नऊ यांच्यावर भादंवि कलम 420,406,465,467, 471,468,506(2),120ब प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राम शिद करीत आहेत.