Breaking News

पीपीई किट घालून ‘त्याने’ पार्थिव स्मशानापर्यंत नेले

कर्जत : प्रतिनिधी

येथील उपजिल्हा रुग्णालयात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान रात्री बाराच्या सुमारास मृत्यू झाला. रुग्णवाहिका असूनही त्या रुग्णाच्या पार्थिवाला स्मशानापर्यंत नेण्यासाठी चालक मिळत नव्हता. त्यावेळी क्षणाचाही विचार न करता कर्जतचे माजी उप नगराध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी पीपीई किट घालून पार्थिव स्मशानापर्यंत नेले व त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. गणपत निकाळजे यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्यूशी झुंज देताना त्यांची प्राणज्योत मालवली. ती वेळ होती रात्री 12 वाजताची. निकाळजे कुटुंबियांना गणपत यांचे पार्थिव स्मशानभूमीपर्यंत कसे न्यायचे, याचा प्रश्न पडला. रुग्णवाहिका होती परंतु ती चालविण्यासाठी  चालक घाबरून तयार होईना. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले कर्जतचे माजी उपनगराध्यक्ष व सध्याचे पाणी पुरवठा सभापती राहुल डाळिंबकर यांनी क्षणाचाही विचार न करता रुग्णालयातून पीपीई किट मागवून घेतले व लगेचच परिधान केले. गणपत यांचे पार्थिव ठेवलेल्या रुग्णवाहिकेचा ताबा घेतला आणि पार्थिव स्मशानभूमीपर्यंत पोहोचविले. त्यांनतर त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेले अनेक दिवस कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आले आहेत. त्यामधील बहुतांश रुग्णांनी कोरोनाशी लढाई जिंकली आहे तर काही रुग्ण मृत्यूशी झुंज देऊन काही दिवसात मृत्यू पावले. त्यांच्या अंत्यविधीसाठी बाळू गुरव, राजू वाघेला, आकाश परदेशी, श्रीकांत वाघेला, रवींद्र गायकवाड तसेच स्मशानभूमीतील प्रवीण धनवटे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल कर्जतकरांकडून कौतुक होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply