अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणेंची माहिती
मुंबई ः प्रतिनिधी
भाजपने औषध कंपन्यांकडून मागविलेला रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा हा महाराष्ट्रासाठीच वापरात येणार होता. या संदर्भात भाजप नेत्यांनी माझ्याशी चर्चाही केली होती, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. त्यामुळे भाजपवर आरोप करणारे महाविकास आघाडीतील अन्य मंत्री व नेते तोंडावर आपटले आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोविड-19 विषाणूवर परिणामकारक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा आहे. अशातच शनिवारी रात्री ब्रूक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्यावर रेमडेसिवीरचा साठा केल्याचा आरोप ठेवला. त्यामुळे रात्री 2 वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि इतर काही भाजप नेते पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी या मालकाला ताब्यात घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावरून राज्यातील मंत्री नवाब मलिक तसेच अन्य काही नेत्यांनी या प्रकरणात भाजपला दोष देत राज्यात रेमडेसिवीरची कमतरता असताना त्याची साठेबाजी करणार्यांना भाजप पाठीशी घालत असल्याचा आरोप केला, पण अखेर राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी भाजपने उपलब्ध करून दिलेला रेमडेसिवीरचा साठा हा राज्य सरकारसाठीच वापरात येणार होता, असे स्पष्टीकरण दिले आहे.
भाजपकडून राज्य सरकारसाठी रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे याबद्दलची कल्पना मला होती. रेमडेसिवीरचे उत्पादन करणार्या कंपनीचे प्रतिनिधी आणि भाजपचे नेतेमंडळी यांची माझ्याच घरी बैठक झाली होती. त्यांनी महाराष्ट्र सरकारला रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करून देण्यास तयारी दाखवली होती आणि मी त्या गोष्टीवर सहमती दर्शवली होती, अशी माहिती शिंगणे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.
रेमडेसिवीरची 60 हजार इंजेक्शन्स भाजपकडून उपलब्ध करून दिली जाणार आहेत याची कल्पना मला होती. ही रेमडेसिवीर इंजेक्शन्स केवळ महाराष्ट्र सरकारसाठीच असल्याचेही मला माहिती होते. रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा हा साठा कोणत्याही दुसर्या हेतुसाठी राज्यात आलेला नाही. भाजप नेत्यांनी साठा आणण्याआधीच याबद्दलची खात्री मला दिली होती.
-राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री