Breaking News

कोरोना रुग्णांसाठी कामोठे एमजीएम रुग्णालयात उपलब्ध होणार 200 बेड

साहित्य खरेदी खर्चास पनवेल मनपाच्या महासभेत मान्यता

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाने 200 आयसीयू बेड देण्याची तयारी दर्शविल्याने या बेडसाठी आणि आवश्यकतेनुसार 200 ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक साहित्य खरेदीस येणार्‍या खर्चाला पनवेल महापालिकेच्या मंगळवारी (दि. 20) झालेल्या महासभेत प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी करून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले होते. या निर्णयाचा फायदा महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांना होणार आहे.
पनवेल महापालिकेची ऑनलाइन महासभा मंगळवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पनवेल महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. या महामारीच्या काळात रुग्णांना उपचारांची व्यवस्था व्हावी यासाठी कामोठे येथील रुग्णालयासोबत करारनामा, तसेच 200 आयसीयू आणि आवश्यकतेनुसार 200 ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्याकरिता येणार्‍या प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळण्याबाबतच्या ठरावास महासभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. एमजीएम रुग्णालयाने 200 आयसीयू बेड पनवेल महापालिकेस देण्याची तयारी दर्शवली असून, त्या दृष्टीने महापालिका सकारात्मक पावले उचलत आहे.
याचबरोबर महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या सिडको नोड्सधील, तसेच 29 महसुली गावांतील हस्तांतरित झालेल्या इमारतींची देखभाल, दुरुस्ती आणि नूतनीकरण तीन वर्षांकरिता वार्षिक तत्त्वावर देण्याच्या ठरावावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे पालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्ती, नूतनीकरण आणि सुधारणा दोन वर्षांकरिता करण्याच्या विषयालाही मंजुरी देण्यात आली. त्यामुळे ही कामेही मार्गस्थ होऊन नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
जम्बो कोविड सेंटरसाठी प्रक्रिया
कळंबोली येथील सीसीआयच्या जागेत 800 बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, याकरिता लागणारा प्रस्ताव तयार करण्याची सूचना सिडकोला देण्यात आली आहे, तसेच आरटी-पीसीआर चाचण्यांचे अहवाल येण्यास विलंब लागत असल्याने एमजीएम रुग्णलयातील लॅबकरिता रुग्णालय प्रशासनासोबत करार करण्याची सूचना करण्यात आली आहे.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply