नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्या कोठडीची आवश्यकता आहे, असं सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) दिल्ली हायकोर्टात सांगितलं. आर्थिक देवाण-घेवाणीत त्यांचा कथितरीत्या थेट संबंध आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचं ईडीनं कोर्टात सांगितलं. रॉबर्ट वाड्रा यांच्यावर लंडनमध्ये 12 ब्रायनस्टन स्क्वेअरस्थित 17 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदीमध्ये मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयानं वाड्रा यांना अंतरिम जामीन दिला होता. या निर्णयाला सक्तवसुली संचालनालयानं हायकोर्टात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी हायकोर्टात गुरुवारी सुनावणी झाली. रॉबर्ट वाड्रा यांना कोठडी देण्यात यावी. कारण त्यांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आर्थिक देवाण-घेवाणीत ज्या बाबी समोर येत आहेत, त्यांच्याशी वाड्रा यांचा कथित संबंध आहे, असं ईडीचं म्हणणं आहे. याशिवाय वाड्रा हे मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला सहकार्य करत नाहीत, असंही ईडीनं हायकोर्टात सांगितलं. वाड्रांच्या वकिलांनी ईडीनं केलेल्या दाव्याचं खंडन केलं आहे. यंत्रणेनं जेव्हा कधी वाड्रा यांना चौकशीसाठी बोलावलं आहे, त्या-त्या वेळी ते हजर झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी चौकशीला संपूर्ण सहकार्य केलेले आहे, असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांना वाड्रा यांनी उत्तरं दिली आहेत. त्यांच्यावर झालेले आरोप न स्वीकारणं याचा अर्थ ते चौकशीला सहकार्य करत नाहीत, असा होत नाही, अशी बाजूही वकिलांनी मांडली. दरम्यान, दोन्हीकडील बाजू ऐकून घेतल्यानंतर याप्रकरणी हायकोर्टानं अंतिम सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. 5 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयानं वाड्रा यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला ईडीनं हायकोर्टात आव्हान दिलं आहे.