Breaking News

रेमडेसिवीर काळ्याबाजारातून खरेदी करू नका

जिल्हा इंजेक्शन, औषधे व मेडिकल मदत कक्षाचे आवाहन

पनवेल : प्रतिनिधी

रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, हे इंजेक्शन डॉक्टरांनी जरी लिहून दिले तरी बाहेरच्या मेडिकलमध्ये कुठेही मिळणार नाही. जिल्हाधिकार्‍यांनी नेमलेल्या समितीमार्फत, रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे, फक्त त्या हॉस्पिटललाच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल, असा सरकारचा आदेश आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन तुम्ही मेडिकलमधून किंवा काळ्या बाजारातून खरेदी करू नका,असे रायगड जिल्हा इंजेक्शन, औषधे व मेडिकल मदत कक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन नातेवाइकांना बाहेर मिळणार नाही. काळ्या बाजारातून तुम्ही औषधे घेत असाल तर फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नातेवाईकांनी आपला महत्वाचा वेळ खर्च न करता हॉस्पिटल प्रशासनाकडेच त्याची वारंवार मागणी करावी. ज्यांना इंजेक्शनची गरज आहे. त्यांनी आधी पुढील मुद्दे लक्षात घेऊन डॉक्टरांशी चर्चा करावी. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिल्यावर त्यांना सांगा की, हे इंजेक्शन हॉस्पिटलनेच मागवायचे आहे. तुम्ही आमच्या पेशन्टसाठी हे इंजेक्शन गरजेचे आहे, असे जिल्हाधिकार्‍यांना कळवले आहे का? जिल्हाधिकारी कोविड वॉर रुमला कळविले असल्यास आमच्या पेशन्टचा इंजेक्शनसाठीचा वेटिंग नंबर काय आहे? डॉक्टरांनी तरीही बाहेरून उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरल्यास डॉक्टरांकडून हे इंजेक्शन आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसल्यामुळे पेशंटच्या नातेवाइकांना बाहेरून आणावे लागेल, असे प्रिस्क्रिप्शन लेटरवर लिहून घ्यावे. तोंडी सूचना घेऊ नये. आपल्या जिल्ह्यातील कोव्हिड वॉर रूमला संपर्क करा. सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक पेशन्टला इंजेक्शन हॉस्पिटलमध्येच उपलब्ध होणार आहे, याची नोंद घ्या. बाहेर कोणत्याही मेडीकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही.

रायगड जिल्हा वैद्यकीय इंजेक्शन आणि औषधे समिती तसेच मेडिकल मदत कक्ष यातील सदस्य सतत सर्व मेडिकलशी संपर्क साधून आहे. याशिवाय महत्त्वाचे रेमडेसिवीर इंजेक्शन द्यावे की न द्यावे यासाठी पेशंटचे वय, पूर्वीपासून असलेले शारीरिक आजार, पेशंटचा एचआरसीटी स्कोअर, सध्याचे ऑक्सिजनचे रक्तातील प्रमाण, शारीरिक लक्षणे इत्यादी विविध घटक विचारात घेऊन निर्णय घेतला जातो. बर्‍याच हॉस्पिटलमध्ये या इंजेक्शन शिवाय देखील बरे झालेले अनेक रुग्ण आहेत. त्यामुळे इंजेक्शन देण्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी, संवाद वाढवावा. इंजेक्शन उपलब्ध होत नसताना, गडबडून जाऊन काळ्या बाजारातून चढ्या भावाने खरेदी करण्याचा अनावश्यक मोह टाळावा. अशामुळे पेशंटला उपाय होण्याऐवजी अपाय होण्याचीच शक्यता जास्त असते. ही माहिती रायगड जिल्हा इंजेक्शन, औषधे व मेडिकल मदत कक्षाच्या वतीने सांगण्यात आली आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply