निविदा निघाली; भर पावसातही काम राहणार सुरू
पोलादपूर : प्रतिनिधी
येथील एसटी स्थानकातील सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीची निविदा अखेर काढण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले सांडपाणी वाहिनी दुरुस्तीचे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, हे काम भरपावसाळ्यात करण्यात येणार असल्याने त्याचा दर्जा आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होणार आहे.
पोलादपूर एसटी.स्थानकाबाहेरच्या विद्यामंदिराकडे जाणार्या रस्त्यालगत दोन वर्षांपुर्वी दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचे डबके तयार झाल्याचे दिसून आले. मात्र त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने एसटी बसेसची रहदारी थांबली होती. आता या स्थानकातील सांडपाणी वाहिनी दुरूस्ती करण्यासाठी पाच लाख 52 हजारांची निविदा वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. हे काम पुर्ण करण्याची मुदत तीन महिन्याची असल्याने ऐन पावसाळ्यातही काम सुरू ठेवावे लागणार आहे.