Breaking News

दिल्लीला हरवून बंगळुरू अव्वल स्थानी

अहमदाबाद ः वृत्तसंस्था
आयपीएलमध्ये रंगतदार झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेने विजय साकारला. बंगळुरूने एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीला 172 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 14 धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने 12 धावा देत बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. डिव्हिलियर्सला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. या विजयामुळे गुणतालिकेत बंगळुरूने अव्वल स्थान पटकावले आहे.
बंगळुरूच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. भन्नाट फॉर्मात असलेला शिखर धवन सहा धावांवर बाद झाला. धवननंतर स्टीव्ह स्मिथही अपयशी (चार धावा) ठरला. पॉवरप्लेनंतर हर्षल पटेलने पृथ्वी शॉला माघारी धाडत दिल्लीला अजून एक धक्का दिला. शॉने 21 धावा केल्या. तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर कर्णधार पंत आणि मार्कस स्टॉइनिस यांनी 45 धावांची भागीदारी रचली. पटेलने स्टॉइनिसला बाद केले. स्टॉइनिसने 22 धावा केल्या. यानंतर शिमरोन हेटमायरने 15व्या षटकात सिराजला षटकात ठोकत दिल्लीचे शतक फलकावर लावले. पंत आणि हेटमायर यांनी अर्धशतकी भागीदारी करीत सामन्याचे चित्र पालटले. शेवटच्या षटकात दिल्लीला 14 धावांची गरज होती, मात्र मोहम्मद सिराजने या षटकात 12 धावाच दिल्या. दिल्लीकडून पंतने सहा चौकारांसह 58, तर हेटमायरने 25 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 53 धावांची खेळी केली.  
तत्पूर्वी नाणेफेक गमावलेल्या बंगळुरूने 20 षटकात पाच गडी गमावत 171 धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या षटकात विराट कोहली (12) आवेश खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशांत शर्माने देवदत्त पडीक्कलची (17) दांडी गुल केली. ग्लेन मॅक्सवेलने रजत पाटीदारसोबत 30 धावांची भागीदारी रचली. आक्रमक खेळणार्‍या मॅक्सवेलला अनुभवी अमित मिश्राने आपल्या जाळ्यात अडकवले. मॅक्सवेल वैयक्तिक 25 धावांवर माघारी परतला.
रजत पाटीदार आणि एबी डिव्हिलियर्स यांनी 14व्या षटकात बंगळुरूचे शतक फलकावर लावले. चांगल्या लयीत खेळणार्‍या पाटीदारला अक्षर पटेलने तंबूचा मार्ग दाखवला. पाटीदारने 31 धावा केल्या. त्यानंतर डिव्हिलियर्सने फटकेबाजी केली. 18व्या षटकात रबाडाने सुंदरला बाद करीत बंगळुरूला संकटात टाकले. सुंदर बाद झाल्यानंतर डिव्हिलियर्सने अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात डिव्हिलियर्सने मार्कस स्टॉइनिसला 23 धावा कुटल्या. डिव्हिलियर्सने 42 चेंडूंत पाच षटकार आणि तीन चौकारांसह नाबाद 75 धावांची खेळी केली. त्यामुळे 20 षटकांत बंगळुरू पाच बाद 171 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकला.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply