Breaking News

‘रेमडेसिवीर’च्या उत्पादनाला वेग

केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. देशभरात अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा तसेच औषधांची कमतरता भासू लागली आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीर या कोरोनाच्या उपचारासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या औषधाचा तुटवडाही भासू लागला आहे. अशातच आता भारतातील रेमडेसिवीरचे उत्पादन वेगाने वाढवले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले आहे.

मनसुख मांडवीय यांनी देशातील रेमडेसिवीरच्या उत्पादनाने वेग घेतला असल्याची माहिती दिली आहे. भारत आपल्या उत्पादनक्षमतेपेक्षा तिप्पट उत्पादन करण्यात यशस्वी झाला असून लवकरच देशातली वाढती मागणी पूर्ण करता येणार असल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सरकारने रेमडेसिवीरच्या कुप्या इतर देशांतून आयात करण्याचे ठरविले आहे. यातील 75 हजार कुप्या शुक्रवारी पोहचणार आहेत. एचएलएल लाइफ केअर लि. या सरकारी कंपनीने साडेचार लाख कुप्यांची आयात मागणी नोंदविली आहे. मे. गिलियड सायन्सेस इनकार्पोरेशन (अमेरिका), मे. इव्हा फार्मा (इजिप्त) यांच्याकडे ही मागणी नोंदविण्यात आली आहे. काही दिवसांत 75 हजार ते एक लाख कुप्या, तर त्यानंतर आणखी एक लाख कुप्या असा दोन टप्प्यांत पुरवठा होणार आहे.

इव्हाफार्मा कंपनी सुरुवातीला 10 हजार कुप्या व नंतर 50 हजार कुप्या जुलैपर्यंत पाठविणार आहे. केंद्र सरकारने लस पुरविण्यासाठी तेलंगणा सरकारला ड्रोन विमानांचा वापर करण्यास प्रायोगिक परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाच्या निवेदनात हे स्पष्ट केलेले नाही की ड्रोन विमाने कुठल्या प्रकारची लस पुरविणार आहेत. तेलंगणा सरकारला मनुष्यरहित विमान सेवा कायदा 2021 अंतर्गत कोविड प्रतिबंधक लस ड्रोनच्या माध्यमातून पाठवण्याची परवानगी देत असल्याचे ट्विटरवर सांगण्यात आले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply