Breaking News

प. बंगालमधील हिंसेविरोधात रायगडात जोरदार निदर्शने

हिंसाचारातून ममता सरकारचे खरे रूप उघड : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू केला असून या हिंसाचारात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात आले आहेत. या राजकीय हिंसाचाराचा उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये पक्षकार्यालयाजवळ कोरोनासंदर्भातील नियम पाळून जोरदार निदर्शने करण्यात आली.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सूडाचे राजकारण सुरू झाले आहे. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करीत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे त्या निषेधार्थ भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. विशेष म्हणजे या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही सहभाग घेऊन पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा व ममता बॅनर्जी सरकारचा निषेध नोंदविला.
या वेळी ’भाजप कार्यकर्त्यांची हत्या करणार्‍या ममता सरकारचा निषेध असो’, ’ममता सरकार हाय हाय’, ’लोकशाहीची हत्या करणार्‍या ममता सरकारचा धिक्कार असो’, ’बंद करा बंद करा, दादागिरी बंद करा’, अशा गगनभेदी घोषणा देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, मुकीद काझी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष वर्षा नाईक, माजी नगरसेविका नीता माळी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, युवा नेते दिनेश खानावकर, अनेश ढवळे, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, शिक्षक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष के. सी. पाटील, रवींद्र नाईक, ज्योती देशमाने, स्नेहल खरे, प्रकाश खैरे, प्रीतम म्हात्रे, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख भरत जुमलेदार, चंद्रकांत मंजुळे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

भाजप देशभरात लोकशाही पद्धतीने काम करीत आहे. त्याच अनुषंगाने निवडणुकाही लोकशाही पद्धतीने लढविल्या जातात. पश्चिम बंगालची निवडणूक संपल्यानंतर शांततेच्या मार्गाने कारभार होणे गरजेचे असताना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांची सर्रासपणे हत्या करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे हिंसाचारातून ममता बॅनर्जी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे खरे रूप दाखविले आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याला सांभाळण्याची गरज होती, मात्र तसे न करता ममता सरकारने अत्यंत चुकीचे राजकारण केले. या हिंसाचाराचा आम्ही जाहीर निषेध करतो.
-आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष, उ. रायगड भाजप

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply