Breaking News

पनवेलमधील रेशनकार्डधारक धान्याच्या प्रतीक्षेत

लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

राज्य सरकारकडून अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू असे पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने गावागावांमध्ये या धान्याचे वाटप होणे गरजेचे होते, मात्र घोषणा करून महिना होत आला तरी अद्याप लाभार्थ्यांपर्यंत मोफत धान्य पोहचले नसल्याचे चित्र दिसून येत आहे. धान्याचे वाटप लवकर करा, अशी मागणी लाभार्थी करीत आहेत.

कोरोनामुळे लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गरीब आणि गरजू रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य शासनाकडून संचारबंदीसह निर्बंध लागू केलेत. त्यामुळे जवळपास सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांचे रोजगार गेल्यामुळे अन्नधान्याविना उपासमार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. ही घोषणा करून जवळपास महिना होत आला तरी पनवेल तालुक्यात अद्याप धान्य वाटपासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली नाही.

राज्य सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र अद्याप धान्य मिळाले नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. घोषणा केल्याप्रमाणे तत्काळ धान्य वाटप करावे, असे सुधीर आंबेकर यांनी सांगितले. हाताला काम नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. राज्य शासनाने घोषणा केली; मात्र धान्याचे वाटप अद्याप रेशन दुकानातून झालेले नाही. मोफत धान्य तत्काळ देणे गरजेचे आहे. लॉकडाऊन किती दिवस आहे, यासंदर्भात काहीच माहिती नाही, असे रवींद्र पाटील म्हणाले.

या संदर्भात पनवेलच्या पुरवठा अधिकारी स्मिता जाधव यांच्याकडे प्रस्तूत प्रतिनिधीने विचारणा केली असता त्या म्हणाल्या, 10 मे पर्यंत पनवेल तालुक्यातील सर्व दुकानांत धान्य पोहचणार आहे. सध्या 40 रेशन दुकानांत धान्य पोच झाले आहे.

पनवेलमध्ये एकूण 193 रेशन धान्याची दुकाने आहेत. दरम्यान, मे महिन्यासाठी वाटप होणारे धान्य हेच मोफतचे धान्य असेल, अशी शक्यता आहे. राज्य शासनाने घोषणा केलेले धान्यदेखील लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. या मोफत धान्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply