सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; वाहतुकीचीही कोंडी
खोपोली : प्रतिनिधी
8 ते 12 मे या कालावधीत भाजी व फळ व्यापारी मार्केट बंद ठेवणार असल्याने, शुक्रवारी (दि. 7) खोपाली भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि या मार्केटकडे जाणार्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. या परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
खोपोली शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन व पोलिसांनी कंबर कसली आहे. कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रशासनाने खोपोली भाजी मार्केटमधील व्यापार्यांना केले होते. त्याला प्रतिसाद देत येथील व्यापारी संघटनेने आठ ते बारा मे या कालावधीत खोपोली व शीलफाटा येथील मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचे वृत्त गुरुवारी शहरात पसरले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून मार्केटमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली, सकाळी 10.30 वाजता सर्व व्यापार्यांची भाजी संपली. अनेक व्यापार्यांनी चढ्या भावात भाजी विकली. या वेळी ग्राहकांनी आणलेल्या वाहनांमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.