महाड : प्रतिनिधी
तरुणांच्या लसीकरणला महाडमध्ये जरी शुक्रवारी (दि. 7) मुहूर्त सापडला असला तरी लोकांची गर्दी, संभ्रम आणि गोंधळामुळे भिक नको पण कुत्रा आवर अशी म्हणायची वेळ आली आहे. शनिवारपासून नियमीत लसीकरणाला सुरूवात होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले आहे.
महाड ग्रामीण रुग्णालयात 16 फेब्रुवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्या वेळी लसीकरणाला फारच अल्प प्रतिसाद मिळाला होता. कोरोनाची दाहकता वाढल्यानंतर मात्र महाड ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी लोकांची गर्दी वाढू लागली. कोरोना रुग्ण दाखल असल्याचे कारण देत महाड ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात हलविण्यात आले आहे. शुक्रवारी या ठिकाणी केवळ 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण केले जाणार होते, मात्र अपुर्या माहितीमुळे ज्येष्ठांसह सर्वांनीच या ठिकाणी गर्दी केली होती. या ठिकाणी केवळ कोवॅक्सीन उपलब्ध असल्याने ज्येष्ठांना लस घेता आली नाही. तसेच 18 ते 44 वयोगटासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक असून जोपर्यंत महाड सेंटरचा मेसेज येत नाही, तोपर्यंत तरुणांनादेखील लस घेता येत नाही. त्यामुळे सेंटरवर येऊनही अनेकांना लस मिळू शकली नाही.
महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आजपासून लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. रविवारसह रोज या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या दरम्यान 18 ते 44 वयोगटासाठी कोवॅक्सीन आणि 45 वर्षापुढील नागरिकांसाठी कोवीशिल्ड अशा दोन्ही गटांना लसीकरण केले जाणार आहे. 18 ते 44 वयोगटासाठी सभागृहाच्या बाजूच्या स्पेसमध्ये तर 44 ते पुढील गटासाठी बहुउद्देशीय सभागृहात लसीकरण केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.
18 ते 44 वयोगटामधील तरुणांनी रजिस्ट्रेशन करुन महाड सेंटरचा मेसेज आल्यावरच लसीकरण केंद्रावर यावे, असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी जिवन पाटील यांनी केले आहे.