Breaking News

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण, विवेक पाटील व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; तत्काळ चौकशी करून कारवाई करणार -पोलीस आयुक्त

पनवेल : रामप्रहर वृत्त

कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा व अफरातफरीप्रकरणी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील आणि संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांची बुधवारी (दि. 22) भेट घेऊन त्यांच्याकडे केली. या अनुषंगाने कर्नाळा बँकेसंदर्भात तत्काळ चौकशी करणार असून यामधील दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी या वेळी दिले.

कर्नाळा बँकेचे सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बँकेने ऑडिट केले असता बेनामी खाती असल्याचे समोर आले आहे. कर्नाळा बँकेत मोठ्या प्रमाणात बेनामी खातेधारकांच्या नावाने खाती उघडून यात कोट्यवधी रुपयांची कर्जरूपी रक्कम देऊन बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, कर्नाळा चॅरिटी ट्रस्टमध्ये ही रक्कम वळती केली असल्याचे अहवालात समोर आले आहे.

विवेक पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या नावाने 63 बेनामी खाती उघडली. या खात्यांत 513 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम कर्जरूपी टाकण्यात आली. तिथून या रकमा विवेक पाटलांच्या मालकीचे असलेले कर्नाळा स्पोर्ट्स क्लब आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये वळत्या करीत त्या हडप करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अवघ्या 63 खात्यांत एवढा मोठा घोटाळा उघडकीस आला. चौकशीच्या अनुषंगाने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यामुळे शेतकरी, नोकरदार, छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदार अशा जिल्ह्यातील एक लाख सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ठेवीदारांनी अनेकदा बँक आणि अध्यक्ष विवेक पाटील यांच्याकडे फेर्‍या मारल्या, मात्र ठेवीदारांना त्यांचे पैसे विवेक पाटील यांनी आजपर्यंत दिले नाहीत. गेल्या चार महिन्यांपासून या बँकेच्या 17 शाखांतील कारभार ठप्प पडला असताना अध्यक्ष व संचालक मंडळ बिनधास्तपणे ठेवीदारांना टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. कर्नाळा नागरी सहकारी बँक बुडित निघाली असून, यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी पणाला लागल्या आहेत. ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत यासाठी अहवालाच्या आधारे बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील, संचालक व संबंधित कर्मचार्‍यांची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीने केली आहे. या वेळी कुंडलिक काटकर हेही उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply