Breaking News

शेअर बाजारातील चांगल्या परताव्याची गेल्या 25 वर्षांची झलक

कोरोनामुळे अर्थव्यवस्था थांबली आहे असे अनेक नागरिकांना वाटत असले आणि ते खरे असले तरी ती लवकरच सुरू होईल आणि पूर्वपदावर येईल, असे शेअर बाजार मानत आहे. त्यामुळेच शेअर बाजार चांगल्या पातळ्यांवर स्थिर झालेला दिसत आहे. अशा शेअर बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करणार्‍यांना कसा चांगला परतावा मिळू शकतो याची ही एक झलक.

गेल्या आठवड्यात अमेरिकेतील अतिशय प्रतिष्ठित अशा हायटेक शेअर बाजारात एक गडबड झाली. विश्वगुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांनी नॅसडॅकचा कणा मोडला अशा काही आशयाची एक बातमी मंगळवारी अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात धडकली. वॉरन बफे यांच्या नेतृत्वाखालील गुंतवणूक गट असलेल्या बर्कशायर हॅथवे शेअर्सचे भाव इतक्या उच्च किमतीला जाऊन पोहचले आहेत की नॅस्डॅक संगणक त्यांची किंमत नोंदविण्यास असमर्थ आहेत. घटनेने मंगळवारपासून कोट प्रसारित करणे थांबविले आणि आज त्याच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. गेल्या मंगळवारी बफेच्या कंपनीने तेजीची नोंद करून आपली शेअर 421, 420 डॉलर

प्रतिशेअरवर बंद केली. कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी ही एक उत्तम बातमी असली तरी वॉल स्ट्रीट जर्नलला ‘इफेक्ट 2000’ची स्टॉक व्हर्जन म्हणून संबोधल्या जाणार्‍या  वृद्धीमुळे नॅस्डॅकला इशारा देण्यात आला. कारण हा उच्चतम भाव नोंदवून त्यामध्ये व्यवहारास असमर्थता दर्शवली. कारण स्टॉक एक्सचेंजचे संगणक जास्तीत जास्त  429,496,7296 किंमत साठवण्यासाठी कॉन्फिगर केले आहेत.

तर सांगायची गोष्ट म्हणजे वर्षानुवर्षे आपल्या विश्वासू गुंतवणूकदारांचे उखळ पांढरे करून देणार्‍या अशादेखील तगड्या कंपन्या आहेत व असे त्यांचे किस्सेदेखील अजीबोगरीब आहेत, मात्र हीच कंपनी लाभांश देण्याच्या बाबतीत अत्यंत कंजूस आहे हे ऐकून धक्का बसू शकतो.

संपत्ती निर्माण करणे हे प्रत्येक मनुष्याचे स्वप्न असते आणि पैसे कमविण्याची हीच आकांक्षा लोक सहसा स्टॉक मार्केटमध्ये आणतात, तथापि शेअर बाजारात गुंतवणूक करताना आपणास सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि हे समजले पाहिजे की दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी धैर्याची आवश्यकता आहे. आपल्याला

हेदेखील समजून घेणे आवश्यक आहे की इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी कौशल्ये, विषय ज्ञान, जोखीम घेण्याची क्षमता आणि वेळ आवश्यक आहे. शेअर बाजारामध्ये संपत्ती निर्माण करण्यासाठी तुम्ही जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे. अल्प मुदतीच्या अस्थिरता असूनही दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीद्वारे भांडवलवृद्धी मिळवता येते.

  मागील वर्षभर आलेले आयपीओ आपण अनुभवले. इनिशिअल पब्लिक ऑफरिंग किंवा आयपीओ या प्रक्रियेद्वारे कंपन्या आपल्या स्टॉकमध्ये समभाग देण्यास सुरुवात करतात. याला प्रायमरी मार्केटमधून शेअर खरेदी म्हणतात आणि त्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर ब्रोकरमार्फत आपण अशा शेअर्सची खरेदी केल्यास त्याला सेकंडरी मार्केट म्हटले जाते. एकदा का कोणती कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत झाली की तिच्या शेअर्सची खरेदी-विक्री ही दुय्यम (सेकंडरी मार्केट) समजली जाते. एकदा चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक (भागीदारी) केली की आपसूकच त्या कंपनीच्या व्यवसायातील वृद्धीमुळे, कमवत असलेल्या नफ्यामुळे त्या कंपनीच्या शेअर्सचे भाव वाढू लागतात व जगभरातील गुंतवणूकदार त्यामध्ये आपली करोडोंची गुंतवणूक करतात. कंपन्या आपल्या नफ्यामधून लाभांशदेखील वाटतात आणि बक्षीस शेअरदेखील जाहीर करतात.   

आपल्या देशातील कंपन्यांचा विचार केल्यास मागील 25 वर्षांचा विचार केल्यास रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक संपत्ती बनवून दिली आहे. 1995 सालापासूनचा विचार केल्यास रिलायन्स इंडस्ट्रीजची संपत्ती 6.3 ट्रिलियन रुपये इतकी आहे आणि त्यामागोमाग हिंदुस्तान युनिलिव्हर, जिच्याद्वारे 4.9 ट्रिलियन रुपये होते. याव्यतिरिक्त एका खासमखास कंपनीविषयी संपूर्ण गोष्ट येत्या काही दिवसांत आपणासमोर मांडणार आहे, ज्याचा सध्या आपल्या शेअर बाजारात खूप बोलबाला आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी काही महत्त्वाचे निकष

-शेअर बाजारात तरलतेला अत्यंत महत्त्व आहे. तरलता म्हणजे शेअर

गुंतवणुकीचा महत्त्वाचा घटक. जेव्हा आपल्याकडे निधी आवश्यक असेल तेव्हा आपण ते विकू शकत नसल्यास एखाद्या शेअरचा भागीदार/गुंतवणूकदार म्हणून असण्याचा कोणताही अर्थ नाही.

-दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीकडे लक्ष द्या. आपल्या गुंतवणुकीत विविधता आणा. गुंतवणूक करण्यापूर्वी कसून संशोधन करा. कंपनीची आर्थिक तपासणी करा. स्पर्धात्मक फायद्यासाठी कंपनी तपासा. व्यवस्थापनाची विश्वासार्हता सत्यापित करा.

सुपर शेअर ः टाटा स्टील

गेले काही वर्षे काहीसा सुस्त पडलेला टाटा स्टीलचा शेअर सध्या चर्चेत आहे आणि त्याला तसेच कारण आहे. टाटा स्टील कंपनीचा चौथ्या तिमाहीचा नफा 48 टक्क्यांनी वाढून 6644 कोटी रुपये झाला असून मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीस 1481 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावयास लागले होते, तर कामकाजामधून आलेले उत्पन्न 49977 कोटी रुपये असून त्यामध्ये 39 टक्क्यांची वाढ आहे. लोह खनिजातील वाढलेल्या किमती पुढील दिवसांतदेखील कंपनीस हात देतील या विश्लेषकांच्या अनुमानावर टाटा स्टील कंपनीचा शेअर गेल्या आठवड्यातील किमतीत 13 टक्के वाढ नोंदवत सुपर शेअर ठरला आहे. चीनच्या निर्यात सूट मागे घेण्यामुळे आंतरराष्ट्रीय स्टील मार्केटमध्ये स्ट्रक्चरल बदल होऊ शकतो. त्यामुळे चीनची निर्यात कमी झाल्याने जागतिक स्टीलच्या किमतींना जास्त काळ आधार मिळू शकेल. आंतरराष्ट्रीय लोह धातूंचे दर वाढलेले आहेत जे अजून संलग्न नसलेल्या कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरून किमतीत अधिक वाढ दिसून येईल आणि देशांतर्गत स्टीलच्या किमती आयात करण्यासाठी सवलतीच्या दरात आहेत ज्या आता वाढीस लागू शकतात. देशांतर्गत कामांमध्ये लोह धातूचे एकत्रीकरण केल्याने कंपनीला नफ्यात स्टीलच्या किमतीत वाढ होण्यास मदत मिळू शकते, असेदेखील विश्लेषकांचे म्हणणे आहे.

-प्रसाद ल. भावे(9822075888)

sharpfinvest@gmail.com

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply