
पनवेल ः वार्ताहर
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 2मधील पालेखुद गावाजवळील फॉरेस्टच्या जागेत बांधण्यात आलेले नवीन तलाठी कार्यालय अद्याप सुरू झालेले नाही. ते केव्हा सुरू होणार, अशी उत्सुकता या परिसरातील नागरिकांना लागली आहे. या परिसरात अनेक गावांचा समावेश आहे. या गावांना शेतसारा भरण्यासाठी, तसेच आपल्या शेतजमिनीचा सातबारा उतारा प्राप्त करण्यासाठी शेतकर्यांना पनवेल किंवा मोरबे येथील कार्यालयात जावे लागत आहे. ही दोन्ही कार्यालये या परिसरापासून 15 किमी इतके लांब आहे. पालेखुद येथे बांधण्यात आलेले नवीन तलाठी कार्यालय लवकर सुरू झाल्यास या परिसरातील नागरिकांना, शेतकर्यांना आपल्या शेतीसंबंधी सातबारा उतारे सहज उपलब्ध होऊ शकतात, तसेच वेळेची बचतही होईल. त्यामुळे हे नवीन तलाठी कार्यालय केव्हा सुरू होईल, अशी उत्सुकता या परिसरातील नागरिकांना लागली आहे, तसेच लवकरात लवकर हे तलाठी कार्यालय सुरू करावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी व शेतकर्यांनी केली आहे.