कर्जत : बातमीदार : तालुक्यातील पोशीर आणि दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील उंबरवाडी आणि शेंडेवाडीमधील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट वाढली आहे. नळपाणी योजनेचे पाणी कधी तरी येत असल्याने महिलांना पायपीट करून खाजगी बोअरवेलवर जावे लागत आहे. दरम्यान, पाणीटंचाई तीव्र असलेल्या या दोन्ही वाड्यात ट्रँकरचे पाणी द्यावे, अशी मागणी होत आहे.
दहिवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या शेंडेवाडीमध्ये नळपाणी योजनेचे पाणी दोन दिवसांनी मिळत आहे. त्यामुळे 40 घरांची वस्ती असलेल्या शेंडेवाडीमधील आदिवासी महिला पिण्याचे पाणी आणण्यासाठी डांबरी रस्त्याने दीड किलोमीटर चालत माथेरान व्हॅली शाळेच्या बाहेर असलेल्या नळावर जातात. त्या शाळेने परिसरातील रहिवाशांसाठी एक नळ बाहेर ठेवला असून तेथून पाण्याचे भरलेले हंडे डोक्यावर घेऊन शेंडेवाडीमधील महिला या पुन्हा घरी पोहचत असतात. त्यांना दोन हंडे पिण्याचे पाणी घरापर्यंत नेण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
या आदिवासी वाडीपासून पुढे काही अंतरावर असलेल्या पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील उंबरवाडीमधील महिलांनाही पिण्याचे पाणी आणण्यासाठी दररोज माथेरान व्हॅली शाळेपर्यंत यावे लागते. उंबरवाडीतील विहिरींनी तळ गाठला असून, तेथ असलेल्या एका खाजगी बोअरवेल आणि नळाच्या पाण्यावर अन्य वेळी या आदिवासी लोकांना अवलंबून राहावे लागते. देवपाडा नळपाणी योजनेचे पाणी या वाडीमध्ये दिवसाआड येते, पण ते पाणी कोणत्या वेळी येईल याचा भरवसा नसल्याने आणि त्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक स्टॅन्ड पोस्टला पाणी थांबवून ठेवण्यासाठी तोटी नसल्याने अचानक पाणी आले, तर ते सर्व वाहून जाते. त्यानंतर या वाडीमधील महिलांना शाळेपर्यंत चालत जाऊन पाणी आणावे लागते. ते अंतर वाडीपासून किमान दोन किलोमीटरपेक्षा अधिक आहे. या त्रासातून आपली सुटका कधी होणार असे या महिलांना वाटते.