पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेने एक लाख कोविड लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून आत्तापर्यंत एक लाख एक हजार 75 लसींचे डोस नागरिकांना देण्यात आले आहे. आजपर्यंत 76 हजार 755 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी 10 हजार 877, पहिल्या फळीतील कर्मचारी 7 हजार 66, ज्येष्ठ नागरिक 34,327, कोमॉर्बिड 19 हजार 721 आणि 18 ते 44 वयोगटातील चार हजार 764 यांचा समावेश आहे.शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यांमध्ये आरोग्य कर्मचारी, दुसर्या टप्प्यांमध्ये पहिल्या फळीवर काम करणारे कर्मचारी, तिसर्या टप्प्यांमध्ये 60 वर्षांवरील तसेच 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी मर्यादित स्वरूपात लसीकरणास सुरूवात करण्यात आली होती व यामध्ये सहा हजार डोस देण्यात आले आहे. आज अखेर पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण एक लाख लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या पालिका क्षेत्रात एकुण 11 शासकीय आणि 14 खाजगी लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. प्रत्येक केंद्रावर रोज 200 कुपन्सचे वाटप केले जात आहे. रोज सरासरी 3500 लसीकरण होत असून आजवर लसीकरणाची 931 सत्रे घेण्यात आली आहेत. पनवेल महानगरपालिकेला शासनाकडून जसे जसे लसींचा साठा महापालिकेला उपलब्ध होईल तसे तसे विविध केंद्रावर नागरिकांसाठी लस देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. 45 वर्षांवरील ज्या नागरिकांचा कोविशिल्डचा दुसरा डोस राहीला आहे. त्या नागरिकांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन डोस घ्यावा असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.