साने गुरुजी स्मारकात अभिव्यक्ती शिबिर

पाली ः प्रतिनिधी
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर येथे 10 ते 13 वयोगटातील मुलांसाठी दिवाळीच्या सुटीत 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर कालावधीत अभिव्यक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वयातील मुलांनाही आता ताण, निराशा, स्पर्धा या सगळ्यातून जावे लागते. शाळेतील पूरक उपक्रम यासाठी उपयोगी पडतातही. परंतु या वयात आवश्यक असलेला माहितीचा, संस्काराचा, स्वयंशिस्तीचा, नव्या अनुभवांचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निखळ आनंदाचा बुस्टर डोस म्हणजे हे पाच दिवसीय अभिव्यक्ती शिबिर असणार आहे. कुमारवयीन मुला-मुलींना अभिव्यक्त होण्याची संधी देण्यासाठी व सुटीची धम्माल करता करता काही नवीन अनुभव, नवीन ज्ञान मिळवण्यासाठी, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या 36 एकरच्या निसर्गसंपन्न परिसरातील कायमस्वरूपी कॅम्प साईटवर आयोजित पाच दिवसीय निवासी शिबीर आहे. 50 मुलांसाठी मर्यादित प्रवेश आहेत. या शिबिरात मातीकाम, पक्षीनिरीक्षण, चित्रकला, कोलाज, ओरिगामी, आकाशदर्शन, नाटक, एडव्हेन्चर उपक्रम, बैलगाडी सफर, योगा, आरोबिक्स, खेळ, गाणी आणि इतर असंख्य उपक्रम घेतले जाणार आहेत. प्रत्येक विषयासाठी नावाजलेले मार्गदर्शन येणार आहेत. स्मारकातील 36 एकरच्या निसर्गरम्य वातावरणात उत्तम व्यवस्था असलेल्या डॉर्ममध्ये राहाण हा देखील एक अविस्मरणीय अनुभव असतो. मुला-मुलींसोबत 24 तास सोबत करायला ताई-दादा असतात. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये दरवर्षी जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांची शिबिरे होत असतात. त्यातीलच सर्व लहानग्यांमध्ये फेमस असलेले हे अभिव्यक्ती शिबीर होय. या शिबिरासाठी नोंदणी सुरु आहे. नोंदणीसाठी इच्छुकांनी 7776937844 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.