रुग्णशय्यांत दुप्पट वाढ; महापालिकेचे नियोजन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी होत असली तरी तिसरी लाट येत्या दोन महिन्यात येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने या लाटेशी मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या काळात उपचाराधीन रुग्णांची संख्या 25 हजारांपर्यंत गेली तरी 12 हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर एकावेळी उपचार करता येतील, असे नियोजन करण्यात येत आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्यतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात पालिका आयुक्तांनी सर्वच विभागाच्या अधिकार्यांची एक बैठक घेतली असून सर्व शक्यतांनुसार आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या जास्तीत जास्त तीन हजार 688 तसेच दुसर्या लाटेत ही संख्या जास्तीत जास्त 11 हजार 605 पर्यंत गेली. पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेत उपचाराधीन रुग्णसंख्या तीन ते चार पटीने वाढली होती. याचा आंदाज कोणालाही नव्हता. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अपुरी पडली होती. खाटा, प्राणवायू व जीवरक्षक प्रणाली अभावी अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे तिसर्या लाटेची तयारी आतापासूनच करण्यात येत आहे.
तिसर्या लाटेत उपचाराधीन रुग्णांची संख्या साधारणत: 25 हजारपार होईल असा एक अंदाज बांधण्यात आला असून त्यापैकी 50 टक्के रुग्ण करोना काळजी केंद्र व रुग्णालयात दाखल होतील. म्हणजे 12 हजार खाटांची तयारी पालिकेला करावी लागणार आहे. त्यात अतिदक्षता खाटांची संख्या 1500 पर्यंत करणे गरजेचे आहे.
सध्या 3000 प्राणवायू खाटा असून त्यामध्ये 2000 खाटांची वाढ करण्यात येणार आहे. 5000 प्राणवायू व साध्या खाटांची संख्या वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. आरोग्य सुविधांत वाढ करताना यासाठी लागणारी जागाही तयार ठेवावी लागणार असून प्रत्यक्ष पाहणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी व आरोग्य विभागाला दिले आहेत.
लहान मुलांची विशेष काळजी
तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकेल असा एक अंदाज आहे. त्यादृष्टीने लहान मुलांसाठी सर्वसाधारण खाटा, प्राणवायू खाटा, अतिदक्षता खाटा यासह पीडियाट्रिक जीवरक्षक प्रणालीची व्यवस्था असलेली विशेष काळजी केंद्रे उभारण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. लहान मुलांसोबत त्यांचे आई किंवा वडील काळजीवाहू म्हणून असतील हे लक्षात घेतले जाईल, तसेच नवजात बालकांसाठीही नियोजन करण्यात येणार आहे.
प्राणवायू प्रकल्पांची उभारणी
दुसर्या लाटेमध्ये प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला होता. हा अनुभव लक्षात घेता पालिकेतर्फे सिडको प्रदर्शनी केंद्रात प्राणवायू प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मे अखेपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल. या व्यतिरिक्त आणखी दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
पहिल्या व दुसर्या लाटेचा अनुभव घेता तिसरी लाट मोठी असू शकते म्हणून खाटा, प्राणवायू याबाबत योग्य नियोजन केले असून भविष्यात या सर्व सुविधांचा तटवडा भासणार नाही. नेरुळ, ऐरोली व बेलापूर येथील नव्या इमारतींमध्ये जास्तीत जास्त सुविधा करण्यात येतील.
-अभिजित बांगर, आयुक्त,