महाड ः प्रतिनिधी
येथील जनकल्याण रक्तपेढीच्या रक्तविघटन प्रकल्पाचा अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी 4 वाजता शुभारंभ होणार असल्याची माहिती रक्तपेढीचे अध्यक्ष धनंजय परांजपे आणि संचालक संजीव मेहता यांनी दिली. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून, पन्नास लाख लोकांना त्याचा फायदा होणार आहे. या रक्तविघटन प्रकल्पात, रक्तामधून फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा, प्लेटलेटस् क्रायोप्रेसिपेटेड आणि पॅक्ड रेड सेल्स हे घटक वेगळे करण्यात येणार आहेत. त्यामुळेे एका रक्त पिशवितून चार रुग्णांची वेगवेगळ्या रक्त घटकांची गरज पूर्ण करता येईल. या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखाने, काही संस्था आणि व्यक्तींचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे परांजपे यांनी सांगितले. सध्या जनकल्याण रक्तपेढीची रक्त साठवण क्षमता अडीच हजार युनिटची आहे. ती चार ते साडेचार हजार युनिटपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे. रक्तपेढीची माणगाव आणि खेड येथे रक्तसाठवण केंद्रे आहेत. या व्यतिरिक्त चिपळूण, दापोली आणि श्रीवर्धन येथे अशा प्रकारची रक्त साठवण केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती परांजपे यांनी दिली.