
पनवेल ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागामधून बदलापूर-पनवेल-बदलापूर प्रवासी बस फेर्या चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे तूर्त बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवासी बांधवांच्या सततच्या मागणीमुळे प्रवासी संघ पनवेल, बदलापूर यांच्या माध्यमाद्वारे ठाणे विभाग नियंत्रक जी. डी. कबाडे व विठ्ठलवाडी आगारप्रमुख शेळके व त्यांचे वाहतूक खात्याचे सहकारी अधिकारी बदलापूर डेपो, विठ्ठलवाडी आगार, जुमळे, जाधव, शेळके व बोरकर, ठाणे यांच्या समवेत विठ्ठलवाडी कार्यालयात प्रवासी संघ पनवेल-बदलापूर संघटनेचे उपाध्यक्ष रंजन एडवणकर, कार्यवाह श्रीकांत बापट, सदस्य डॉ. मनीष बेहेरे, उपेंद्र मराठे, अस्लम नाईक, चंद्रकांत पवार यांच्याबरोबर संयुक्तिक बैठक झाली. त्यामध्ये वेळापत्रक व परिक्रमा यावर तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा व प्रत्यक्ष पाहणी होऊन खालील वेळापत्रकाप्रमाणे बससेवा सुरू करण्यात आली आहे.
वेळापत्रक
बदलापूर-पनवेल- सकाळी 6, 8, 9, 9.30,
दुपारी 11.10, 16., संध्याकाळी 17.30, पनवेल-बदलापूर- सकाळी 6.50, 7.50, 9.30, दुपारी 15.45, संध्याकाळी 18.00, 19.30.
सरकारी, निमसरकारी कर्मचार्यांच्या मागणीप्रमाणे सद्यस्थितीत फेर्या चालू करण्यात आल्या आहेत. कामगारांच्या शिफ्टप्रमाणे (तळोजा-नावडा-बदलापूर-अंबरनाथ) औद्योगिक कामगारवर्गासाठी प्रवासी बससेवा चालू करण्यासाठीच्या व नवीन परिक्रमा मार्गाच्या प्रस्तावावर प्रशासनातर्फे संयुक्तिक पाहणी सर्व्हे लवकरच पूर्ण करून नवीन वर्षाची भेट औद्योगिक कामगारांना मिळेल, असा आशावाद एसटी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
नवीन परिक्रमा मार्ग
बदलापूर फायर स्टेशनपासून सुटणार-आपटेवाडी चौक-घोरपडे चौक-जुना पेट्रोलपंप-(जंक्शन)-ग्रामीण रुग्णालय-(बदलापूर)-क्रीडा संकुल-डी मार्ट-(चिकलोली)-पनवेलकरनगरी-आनंदनगर-अंबरनाथ-एमआयडीसी-तळोजा एमआयडीसीमार्गे-नावडा फाटा -रोडपाली-कळंबोली-खांदा कॉलनी-नवीन पनवेल-पनवेल आगारपर्यंत.
RamPrahar – The Panvel Daily Paper