Breaking News

सिडकोतर्फे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

नवी मुंबई ः प्रतिनिधी

सिडकोतर्फे शुक्रवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे सकाळी 7 ते 9 या वेळेत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि नवी मुंबई सिटीझन्स या संस्थाचांही या योग शिबिराच्या आयोजनामध्ये सहभाग आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केल्यानंतर सन 2015पासून हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिन ही एकप्रकारे योग विद्येला दिलेली मानवंदनाच आहे. प्राचीन भारतीय योग विद्या हे शारीरिक व मानसिक आरोग्यप्राप्तीचे तसेच आत्मिक उन्नतीचे एक उच्च प्रतीचे साधन आहे. आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात उत्तम आरोग्य व मन:स्वास्थ्य हवे असल्यास योगाभ्यासाला पर्याय नाही. केवळ भारतातच नाही, तर परदेशातील अनेक नागरिकांनीही आपल्या जीवनशैलीमध्ये योगाभ्यासाचा अंतर्भाव केला आहे.पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनापासून म्हणजे सन 2015पासून सिडकोतर्फे दर योगदिनी अशा प्रकारच्या योग शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. नवी मुंबईतील नागरिकांमध्ये योगविद्येचा प्रसार व्हावा व त्यायोगे त्यांना आरोग्यप्राप्ती व्हावी, या उद्देशाने सिडकोतर्फे योग शिबिरांचे आयोजन करण्यात येते.  यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग, नवी मुंबई या संस्थेतील योग प्रशिक्षक उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार इत्यादींचे धडे देणार आहेत, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या देशभरातील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देशातील 22 ठिकाणी अधिकाधिक लोकांकडून सलग तीन मिनिटे वीरभद्रासन करवून घेण्याचा विक्रम करवून घेण्यात येणार आहे. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरामध्ये नवी मुंबईतील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply