Breaking News

आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचा दबदबा

सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थान कायम

मुंबई ः प्रतिनिधी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग पाचव्या वर्षी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपला दबदबा कायम राखलाय. आयसीसीने गुरुवारी (दि. 13) जाहीर केलेल्या वार्षिक कसोटी क्रमवारीत टीम इंडियाने 121 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले, तर 120 गुणांसह न्यूझीलंडही अव्वल स्थानावर विराजमान आहे.    

भारतीय संघ 2017, 2018, 2019, 2020 व 2021 या सलग पाच वर्षांत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. भारतीय संघाने सातव्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान कायम राखताना कसोटीची मानाची गदा जिंकली. ऑस्ट्रेलियाने नऊ वेळा हा पराक्रम केला आहे. 

भारतीय संघाने एका रेटिंग गुणासह 121 गुणांची कमाई केली आहे, तर न्यूझीलंड एका गुणाने पिछाडीवर आहे. भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलियावर, तर 3-1 अशा फरकाने इंग्लंडवर विजय मिळविला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडने वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या संघांविरुद्धच्या मालिका 2-0 अशा फरकाने जिंकल्या आहेत. मे 2020पासून खेळलेल्या सर्व सामन्यांच्या निकालातून 100 टक्के आणि त्याआधीच्या दोन वर्षांच्या निकालातील 50 टक्के या पद्धतीने गुण देण्यात आले आहेत. इंग्लंडने तिसर्‍या क्रमांकावर झेप घेताना ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. त्यांनी 2017-18मध्ये ऑस्ट्रेलियावर 4-0 असा विजय मिळविला होता.

पाकिस्तानने तीन गुणांची कमाई करताना पाचवे स्थान पटकाविले आहे, तर वेस्ट इंडिजने बांगलादेशवर 2-0 असा विजय आणि श्रीलंकेविरुद्ध 0-0 अशा निकालाच्या जोरावर सहाव्या स्थानी झेप घेतली. 2013नंतर ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. दक्षिण आफ्रिका सातव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकल्यास ते अव्वल स्थानी विराजमान होतील.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply