विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात
मुंबई : प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून महाराष्ट्रावर दरडींनी घाला घातल्याचं चित्र पाहायला मिळालं असून अजूनही पुनर्वसन असो किंवा मदतीबाबत राज्य सरकारकडून कोणताही दीर्घकालीन निर्णय घेण्यात आला नाही. लोकांसाठी पुनर्वसनाच्या योजना अनेक आहेत प्रश्न केवळ तत्काळ अमलबाजावणीचा आहे. पैशांची कमी नाही, योजनांची कमी, नाही केवळ राज्य सरकारने इच्छाशक्ती दाखवत योजना तत्काळ अमलात आणाव्या, अशी मागणी करत असताना सर्व काही ठीक झाल्यानंतर वरातीमागून घोडे नाचवणार असाल, योजनांवर भर देणार असाल, तर त्याचा काही उपयोग नाही, अशी घणाघाती टीका सोमवारी (दि. 26) विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली.
अतिवृष्टीमुळे दरडीखाली सापडलेल्या पोलादपूर, सुतारकुंड व महाड येथील आपत्तीग्रस्त रुग्णांना मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज त्यांची भेट घेऊन रुग्णांची विचारपूस केली. त्या वेळी संबंधित डॉक्टरांना रुग्णांची अधिक काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या, तसेच काही मदत असल्यास भाजप आपल्या सोबत असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. पुढे बोलताना दरेकर म्हणाले, जे. जे. रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची परिस्थिती काय आहे? त्यांच्यासाठी उपाययोजना काय आहे? हे पाहण्यासाठी आलो. आज ते बेडवर असतानाही त्यांना भविष्याची चिंता लागू आहे. येथून बाहेर निघाल्यावर आम्ही राहणार कुठे, खाणार काय याची काळजी त्यांना लागली असून आर्थिक, मानसिक दृष्ट्या ते कमकुवत झाले असल्याचे दरेकर यांनी सांगितले.