कर्जत : प्रतिनिधी
कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराजांची अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक वर्षांपासून होणारी जत्रा यंदाही कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. या जत्रेच्या निमित्ताने होणारी कुस्ती स्पर्धाही रद्द करण्यात आल्याने यंदा हा आखाडा कुस्ती विना राहणार आहे. ग्रामदैवत श्री धापया महाराजांची अक्षय्य तृतीयेला दोन दिवसांची जत्रा असते. लघुरुद्र, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम करून संध्याकाळी कर्जत शहरातून श्री धापया महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येते. दिवसभर सर्वधर्मीय आपल्या ग्रामदैवताचे दर्शन घेतात. मात्र कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेंद्र बबन चंदन यांनी सांगितले. अक्षय्य तृतीयेच्या दुसर्या दिवशी कुस्तीचा आखाडा असतो. या आखाड्याला शंभर अधिक वर्षांची परंपरा आहे. येथे कुस्त्या खेळण्यासाठी स्थानिकांसह जिल्हा, राज्यातीलच नव्हे तर देशभरातून पहेलवान येथे येत असतात. या आखाड्यातील कुस्त्याही रद्द करण्यात आल्याचे चंदन यांनी स्पष्ट केले.