पनवेल : प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसर्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने कडक निर्बंध जाहीर केले. यामुळे कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आला आहे, परंतु असे असले तरीही अजूनही काही नागरिक विनाकारण इतरत्र ठिकाणी फिरताना दिसून येत आहेत. पनवेलमध्ये शनिवारी (दि. 15) अशा नागरिकांची अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या नागरिकांची इंडिया बुल कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येणार आहे. पनवेल शहरातील उरण नाका, ठाणा नाका, करंजाडे परिसर याठिकाणी सदरची कारवाई महापालिका आणि पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आली. या वेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर्स आणि कर्मचारी हेदेखील उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लागू करण्यात आले. तेंव्हापासून मागील दोन महिन्यांमध्ये पनवेल महापालिका आणि पोलीस प्रशासन तसेच ग्रामीण भागात महसूल प्रशासन यांच्यासोबत एकत्रितरीत्या कारवाई करण्यात येत आहे. संचारबंदीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणारे नागरिक तसेच आस्थापनांवरदेखील कारवाई करण्यात येत आहे. परिमंडळ-2 क्षेत्रात मागील महिन्यात सुमारे 35 हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मास्क न वापरणार्या साडेपाच हजार नागरिकांवर कारवाईचा बडगा उगरण्यात आला. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे आणि आस्थापनांच्या निगडित असलेले निर्बंध न पाळणे तसेच ई-पास नसतानाही विनाकारण वाहने घेऊन फिरणार्या नागरिकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. पनवेलमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट पडली असल्याने कोरोनाची लाट ओसरली असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फारणार्या नागरिकांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. बहुतांश नागरिक औषधे आणायला जात असल्याचे खोटे कारण सांगून 7 ते 11 या वेळेनंतरही बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. करंजाडे परिसरात अनेक मेडिकल स्टोअर्स असूनदेखील त्याठिकाणीचे नागरिक पनवेल शहरात येत असून एका भागातून दुसर्या भागात फिरत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे या गोष्टीला पायबंद बसणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना सरकारने कोरोना चाचणी बंधनकारक केली असून त्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना बाहेर पडण्याची मुभा आहे. जेणेकरून अत्यावश्यक सेवा देत असताना त्यांच्यापासून इतरांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यार नाही. याचबरोबर विनाकारण मॉर्निंग वॉक व इविनिंग वॉकसाठी बाहेर फिरणार्या नागरिकांची कोरोना चाचणी झालेली नसते. त्यामुळे त्यांच्यापासून देखील कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. या प्रकाराला पायबंद बसावा याकरिता महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकासोबत अशा नागरीकांवर दंडात्मक कारवाईशिवाय त्यांची आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय महापालिका आणि पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शनिवार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकातील डॉ. अंजली सावंत आणि त्यांचे सहकारी यांनी शहरातील उरण नाका याठिकाणी अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त विनाकारण फिरणार्या नागरिकांची कोरोना चाचणी केली. उरण नाका परिसरात सकाळच्या सत्रात विनाकारण फिरणार्या 76 जणांची आरटी-पीसीआर टेस्ट आणि 65 जणांची अँटीजेन टेस्ट केली असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र 1, कोळीवाडाच्या डॉ. अंजली सावंत यांनी दिली. रॅपिड अँटिजन चाचणीमध्ये सगळेजण निगेटिव्ह आले आहेत, मात्र आरटी-पीसीआर चाचणीमध्ये कोणी पॉझिटिव्ह आल्याचे आढळल्यास त्यांना इंडिया बुल्स कोविड सेंटर येथे दाखल केले जाणार आहे. यासाठी चाचणी केलेल्या नागरिकांचे दूरध्वनी क्रमांक आणि रहिवासी पत्ते घेऊन ठेवण्यात आले आहेत.
नागरिकांनी वैद्यकीय अथवा अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडणे टाळावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पनवेल महानगरपालिका, पोलीस प्रशासनदेखील विविध उपाययोजना राबवत आहे. यासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल
-अजयकुमार लांडगे, वरिष्ठ निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे