Breaking News

विधानसभेचा सामना एकतर्फी होणार : मुख्यमंत्री निवडणुकीनंतर शेकापचे अस्तित्व मायक्रोस्कोपमध्ये शोधूनसुद्धा सापडणार नसल्याचा टोला

पेण : प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सामना एकतर्फी होणार असून, निवडणुकीनंतर शेकापचे अस्तित्व मायक्रोस्कोपमध्ये शोधूनसुद्धा सापडणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 11) येथे विरोधकांना फटकारले. या वेळी त्यांनी माजी मंत्री व पेणमधील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन उपस्थित विराट जनसमुदायाला केले.

या सभेला व्यासपीठावर आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष व भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, संघटन मंत्री सतीश धोंड, भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे पेणमधील उमेदवार रविशेठ पाटील, अलिबागमधील उमेदवार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिल तटकरे, अवधूत तटकरे, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, आरपीआयचे कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड, भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, पेण तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, शिवसेनेचे जि. प. सदस्य किशोर जैन, उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुुकाप्रमुख अविनाश म्हात्रे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, एमएमआरडीए अंतर्गत नियमांचे उल्लंघन करून वाशी-खारेपाट विभागासाठी 38 कोटी रुपयांचा निधी मी स्वत: उपलब्ध करून दिला आहे. ज्याचे सरकार त्यांचाच निधी असतो, परंतु शेकापसारखे पक्ष त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात ही हास्यास्पद बाब आहे. रविशेठ पाटील, तुम्ही 38 कोटीच काय, या पाणी योजनेसाठी 50 कोटी मागा, तेसुद्धा द्यायला मी तयार आहे. यंदा पेण मतदारसंघात भाजपचे कमळ फुलून 24 तारखेनंतरचे आमदार रविशेठ पाटील असणार, असा विश्वास व्यक्त करून राज्यात महायुतीचेच सरकार येणार हे शाळकरी पोरगासुद्धा आता तुम्हाला सांगू शकतो, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पेण शहर व संपूर्ण तालुका एमएमआरडीए अंतर्गत आल्याने पेणच्या विकासासाठी एमएमआरडीएचा खजिना रिकामा करून पेणचा सर्वांगीण विकास करणार, हा माझा शब्द रविशेठ पाटील तुम्हाला आहे. पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील व तमाम मतदार बांधवांना मी सांगतो की, पेण तुम्हाला विकासाच्या प्रगतिपथावर दिसेल. रायगड जिल्ह्यात मोठमोठे उद्योग येऊन हा जिल्हा राज्यात रोजगारनिर्मितीचे केंद्र बनेल, परंतु येथील पर्यावरणाला धक्का न लावता पर्यटन व उद्योगातून रोजगारनिर्मिती करून आम्हाला पुढील पाच वर्षांत विकासाचा अजेंडा राबवायचा आहे. स्थानिक प्रश्नांबरोबरच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 370 कलम हटवून देश एकसंध केल्याने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सारा देश पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा गौरव करीत आहे. आघाडी सरकारने गेल्या 15 वर्षांत जे केले नाही, ते आम्ही पाच वर्षांत करून दाखविले. यामध्ये सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून वैयक्तिक लाभाच्या विविध योजना, उपक्रम, निर्णय, शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी योजना, त्यांच्या खात्यावर थेट अनुदान, शेतमालाला हमीभाव, बचतगटांना एक लाखाचे बिनव्याजी कर्ज, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, मराठा आरक्षण, धनगरांसाठी आरक्षण, आरोग्य विमा योजना, मच्छीमारांसाठी वेगळे मंत्रालय, त्यातून फिशिंग जेटी अवजारांसाठी कर्ज, ओबीसींसाठी तीन हजार कोटींचे स्वतंत्र मंत्रालय असे सारे काम सरकारने सामान्य माणूस नजरेसमोर ठेवून केले आहे. त्यामुळे आता आमच्यासमोर तगडा विरोधी पक्ष नसल्याने विधानसभा निवडणुकीत मजाच दिसत नाही. सगळे विरोधक थकले आहेत. त्यामुळे हा सामना मतदानापूर्वींच आम्ही जिंकला आहे. येत्या 24 तारखेला निकालातून ते तुम्हाला दिसेलच, पण 21 तारखेला महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांना कमळाचे बटण दाबून आपण विजयी करायचे आहे. त्यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी सरकारला मत, त्यांना मत म्हणजे राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला मत याची जाणीव ठेवून आपले पवित्र कर्तव्य बजावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, पेण तालुक्यात मी ज्या ठिकाणी गावाचे दौरे केले तेथे अंतर्गत रस्ते, गावचे रस्ते रविशेठ पाटील यांनीच केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मंत्री म्हणून त्यांची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे जनतेकडून मला कळाले. असा नेता भाजपतर्फे उमेदवारी करतो तेव्हा त्यांना सर्वांनी साथ देणे आवश्यक आहे.

रविशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा गौरव केला. मुख्यमंत्री शब्दाला जागणारे नेते आहेत. त्यांनी मला शब्द दिला आणि पेण विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे मला उमेदवारी मिळाली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे लोकाभिमुख काम करणारे मुख्यमंत्री आहेत, असा माझा ठाम विश्वास आहे. उद्याचे मुख्यमंत्रीसुद्धा तेच असणार आहेत. या वेळी पाटील यांनी शेकाप पुढार्‍यांच्या खोट्या व कुटील राजकारणाचा समाचार घेतला. शेकापच्या पूर्व विभागातील जे 100 संवेदनशील बूथ आहेत त्या ठिकाणी लक्ष द्या, मग यांची अवस्था काय होते ते पाहा. जवळजवळ 40 वर्षे यांचा हाच खेळ सुरू आहे. त्यामुळे ही मंडळी निवडून येतात. हे प्रकरण एकदाचे थांबवा म्हणजे शेकापचा आमदार कुठल्या कोपर्‍यात बसेल, असे ते म्हणाले. येथील खारभूमी योजनेतील बंधारे फुटल्याने हजारो एकर शेतजमीन नापीक झाली आहे. त्यासाठी निधी द्यावा. गणपती कारखानदार व्यवसायामुळे येथे रोजगारनिर्मिती झाली. त्यांना सबसिडी मिळावी. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, पण खारभूमी आणि गणेशमूर्ती व्यवसायांना आधार देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविशेठ पाटील यांच्यावर सुंदर कविता करून उपस्थित जनसमुदायाची वाहवा मिळवली, तर आरपीआयचे कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड, शिवसेनेचे अविनाश म्हात्रे, नरेश गावंड, भाजपचे गंगाधर पाटील, अ‍ॅड. महेश मोहिते यांचीही भाषणे झाली.

सरकारने जनतेची मने जिंकली : पालकमंत्री

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात शेतकरी, कष्टकरी व सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केंद्रातील नरेंद्र मोदी, तर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने केले, तसेच शेवटच्या झोपडीपर्यंत वैयक्तिक लाभाच्या व विकासाच्या योजना गेल्या पाच वर्षांत राबवून जनतेची मने जिंकली असल्याचे सांगितले. रविशेठ पाटील यांच्या रूपाने प्रामाणिक माणसाला आपण सर्वांनी निवडून द्यायचे आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या सोबतीने सभागृहात बसवायचे आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.

शेकाप खोटे बोलण्यात पटाईत आहे. वाशी-खारेपाटासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला 38 कोटी रुपयांचा निधी आम्हीच आणला, अशी बोंब शेकापवाले मारत आहेत, पण जनतेला सर्व काही माहीत आहे.

-रविशेठ पाटील, उमेदवार

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply