खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शनिवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांसाठी बैठकीचे आयोजन केले होते.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय तसेच इतर महाविद्यालयातील सर्व शाखेतील माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुरुजनांशी संवाद साधता यावा तसेच त्यांच्या अनुभवांचा फायदा महाविद्यालयासाठी व्हावा तसेच भविष्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये व महाविद्यालयांमध्ये चांगले ऋणानुबंध असावेत यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी या बैठकीमध्ये महाविद्यालयातील सर्व शाखेतील माजी विद्यार्थ्यां व विद्यार्थिनी सोबत संवाद साधला व त्यांनी माजी विद्यार्थी संघटनेची नोंदणी विषयी तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्यत्व तसेच भविष्यामध्ये माजी विद्यार्थी संघटनेच्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम घेण्यात येणार आहे याविषयी मार्गदर्शन केले.
या बैठकीचे आयोजन प्रा. अंकिता जांगिड (सचिव, माजी विद्यार्थी संघटना) यांनी केले तसेच प्रा. रेवन शिंदे यांनी माजी विद्यार्थी संघटने विषयी आपले विचार मांडले ,प्रा. प्रवर शर्मा, प्रा. डॉ. अविनाश जुमारे यांनी सहकार्य केले तसेच बैठकीच्या शेवटी सर्वांचे आभार मानले.
अनुभव कथन व कलांचे सादरीकरण
या बैठकीमध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव कथन केले व भविष्यामध्ये महाविद्यालयांमध्ये व माजी विद्यार्थ्यांमध्ये असेच ऋणानुबंध असतील असे जाहीर केले. सभेच्या शेवटी काही माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलांचे प्रदर्शन करीत वेगळी गीते, नृत्ये सादर केली व बैठकीचा आनंद घेतला.