Breaking News

मोबाइल चोरी, फसवणुकीच्या घटनांत वाढ

पनवेल, उरण, नवी मुंबईत सराईत चोर अटकेत

पनवेल : वार्ताहर

पनवेल, उरण, नवी मुंबई परिसरात चोरीच्या व फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून दररोज एक ते दोन प्रकार समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत सराईत चोरांनी दहशत माजवली आहे. नागरिकांना लुटणे, मोबाइल चोरणे, अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटना घडत असताना पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे आव्हान ठरत आहे.

चोरी केलेल्या मोबाइलमधील एटीएम कार्डची माहिती चोरून त्याद्वारे मोबाइलधारकाच्या बँक खात्यातून 30 हजार रुपयांची रक्कम परस्पर काढुन घेणार्‍या अमन रामबिसवास कुशवाह (वय 21) या चोरट्याला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली आहे. गत ऑक्टोबर महिन्यामध्ये उरणमध्ये ही घटना घडली होती.

अटक आरोपी अमन कुशवाह याने ऑक्टोबर महिन्यामध्ये उरण भागातून एका व्यक्तीचा आय टेन कंपनीचा मोबाइल फोन चोरला होता. मोबाइलमध्ये गुगल पे ऍफ्लीकेशन वापरून मोबाइल धारकाच्या बँक खात्यातून 30 हजार रुपयांची रक्कम दुसर्‍या खात्यात वळती करून फसवणूक केली. उरण पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने देखील या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता. त्यानंतर सायबर सेलच्या पथकाने या गुह्याचा तपास करून आरोपी अमन कुशवाह याला ताब्यात घेतले.

दुसर्‍या घटनेत रेल्वे प्रवाशांचे मोबाइल फोन चोरणार्‍या एका सराईत चोरट्याला वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. चांद अब्दुल शेख (वय21) असे या आरोपीचे नाव असून त्याने व त्याच्या साथीदाराने काही दिवसांपुर्वी एक लाख रुपयांच्या नोटा असल्याचे भासवून एका प्रवाशाला कागदी नोटांचे बंडल देऊन त्याचा मोबाईल फोन लुबाडल्याचे त्याच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यानुसार या आरोपीला दुसर्‍या गुन्ह्यातदेखील रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

घटनेतील तक्रारदार सविता घालके (रा. घणसोली) घणसोली ते जुईनगर असा रेल्वेने प्रवास करत असताना अज्ञाताने त्यांच्या पर्समधील मोबाइल फोन चोरला होता. त्यांनी याबाबत वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपी चांद अब्दुल शेख याला अटक करून त्याच्याकडून चोरीचा मोबाइल फोन हस्तगत केला. चांदकडे अधिक चौकशी केली असता, त्याने व त्याचा साथीदार बबलु या दोघांनी काही दिवसापुर्वी सानपाडा रेल्वे स्टेशनजवळ एक लाख रुपयांच्या नोटांचे बंडल असल्याचे भासवून एका प्रवाशाला कागदी नोटांचे बंडल देऊन त्याच्याकडून मोबाइल फोन लुबाडून नेल्याचे कबूल केले.

तिसर्‍या घटनेत लाखो रुपये किमतीच्या सेंट्रिंग प्लेटा चोरणार्‍या दोघा सराईत आरोपींना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून सेंट्रिंग प्लेटसह गुन्ह्यात वापरलेल्या दोन रिक्षा असा मिळून जवळपास पाच लाख 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

वावंजे येथे एका बिल्डिंग येथे ठेवलेल्या 2,90,000 रुपयांच्या लोखंडी सेंट्रिंग प्लेटा चोरी करून नेल्याबाबत तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही तांत्रिक तपास करून मोनिस अली जाफर सय्यद (वय 28, रा. तळोजा) व गुफरान शब्बीर पटेल (वय 23, रा. तळोजा) तसेच एका विधी संघर्ष ग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन रिक्षांसह जवळपास पाच लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply