नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
छत्रसाल स्टेडियमवरील हत्या आणि मारहाणप्रकरणी दोन ऑलिम्पिक पदके विजेता कुस्तीपटू सुशील कुमारने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, माझ्याविरोधातील चौकशी ही पक्षपाती असून, माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा सुशीलने केला आहे.
छत्रसाल स्टेडियमवर 4 मेच्या रात्री झालेल्या मारहाणीत 23 वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर राणाची हत्या झाली, तर सोनू आणि अमित कुमार जखमी झाले. या प्रकरणी सुशील आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता. सुशीलला पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाखाचे रोख इनामसुद्धा जाहीर केले होते. हत्या, अपहरण आणि गुन्हेगारी कट अशा प्रकारचे आरोप सुशीलवर असल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जगदिश कुमार यांनी सुशीलचा जामीन नाकारला.
अटकेच्या भीतीने सोमवारी सुशीलने दिल्लीमधील रोहिणी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. घटनेचे योग्य आणि खरे चित्र समोर येण्यासाठी मी चौकशी यंत्रणांना मदत करीन, असे सुशीलने त्या वेळी म्हटले होते. दिल्ली पोलिसांनी सुशील आणि त्याच्या साथीदारांवर भा. दं. वि. कलम 302, 308, 365, 323, 341, 506, 188, 269, 120-बी आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …