Breaking News

रायगडमधील जनता महायुतीला साथ देईल

आमदार प्रवीण दरेकर यांचा विश्वास

महाड : महेश शिंदे

कोकणातला मतदार हा विचाराअंती मतदान करतो. येथील नागरिकांना भ्रष्टाचारी आणि सदाचारी यातला फरक समजतो. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ जनता सुनील तटकरेंच्या भूलथापांना बळी न पडता केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्याच पाठीशी उभी राहील आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून देईल, असा विश्वास भाजपचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत ते ‘रामप्रहर’शी बोलत होते.

महायुतीचे उमेदवार ना. अनंत गीते हे स्वच्छ चारित्र्याचे निष्कलंक आणि हुशार नेते आहेत. म्हणून मोदीजींनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट केले. हा आपल्या रायगड जिल्ह्याचा बहुमान आहे. पुढच्या मंत्रिमंडळातही ना. गीते महत्त्वाच्या खात्याचे मंत्री असतील, अशी मला खात्री आहे असे सांगून आपल्या मुलाखतीत आमदार दरेकर म्हणाले की, गीते साहेबांनी प्रामाणिकपणे विकासकामे करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते प्रसिद्धीपासून चार हात दूरच राहतात. रायगड संवर्धनात 650 कोटींचा विकास, पंतप्रधान सडक योजनेंतर्गत रस्त्याचे जाळे, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, रेल्वेचे दुपदरीकरण, रोहापर्यंत उपनगरी रेल्वे सेवा ही कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून गीते साहेबांनी रायगड, कोकणात पूर्ण केली आहेत. यापुढे प्रत्येक वेळी मी पत्रकारांशी संवाद साधून गीतेंची आणि युतीची कामे जनतेपर्यंत पोहचविणार आहे.

भाजपने आपली पूर्ण ताकद रायगड मतदारसंघात लावली असून, भाजपचे कार्यकर्ते गीते साहेबांसाठी ईर्ष्येने व जोमाने काम करीत आहे. अन्य मित्रपक्षही शिवसेनेच्या सोबत असून, महायुती एकदिलाने काम करीत आहे, मात्र दुसरीकडे मधुकर ठाकूर, माणिकराव जगताप, जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यातील हाडवैर जगाला माहीत आहे. हे वाद, दगाफटका महाआघाडीतील कार्यकर्ते मात्र विसरलेले नाहीत. त्यामुळे स्वार्थ अन् सत्तेसाठी जरी नेत्यांचे मनोमीलन झाले असले, तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे. शेकाप आणि काँग्रेसचा कार्यकर्ता एकवेळ गीतेंना मतदान करेल, मात्र विश्वासघात करणार्‍या तटकरेंना आपले मत देणार नाही. याचे उदाहरण म्हणजे माजी मुख्यमंत्री कै. बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांच्या नेतृत्वाखाली असंख्य मुस्लिम तरुण आज युतीत सहभागी होत आहेत, असे आमदार दरेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीच्या वळचणीला जाऊन अनंत गीतेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहे. या संदर्भात बोलताना आमदार दरेकर यांनी, मनसेने गीते साहेबांवरील आरोप सिद्ध करावेत, मी राजकारण सोडून देईन, असे आव्हान देऊन राज ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य ते उत्तर देत आहेत, पण राष्ट्रवादीला भाड्याने नेता आणायची वेळ आली हे त्यांचे दुर्दैव असल्याचेही त्यांनी म्हटले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात देशातील दोनशे पक्ष एकत्र येऊन जी आघाडी निर्माण झाली आहे, त्या आघाडीत पंतप्रधान कोण यात एकवाक्यता नाही. त्यामुळे प्रचंड लोकप्रियता असलेले आणि विकासाची जाण असलेले मोदीच या देशाचे सक्षम नेतृत्व करू शकतात, असे शेवटी आमदार दरेकर यांनी अधोरेखित केले.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply