Breaking News

महाड तालुक्यात चक्रीवादळामुळे 451 घरांचे, 30 गोठ्यांचे नुकसान

18 जिल्हा परिषद शाळांचीदेखील हानी

महाड ः प्रतिनिधी

गतवर्षी निसर्ग चक्रीवादळातून सावरणार्‍या कोकणातील नागरिकांना या वर्षी पुन्हा एकदा तोक्ते चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. महाड तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पंचानाम्यातून जवळपास 451 घरांचे नुकसान झाले आहे. घरांबरोबरच इतर खासगी मालमत्ता आणि शासकीय मालमत्तेचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.

महाड तालुक्यात तोक्ते चक्रीवादळ थेट धडकले नसले तरी झालेल्या वादळी पावसामुळे ग्रामीण भागातून मोठे नुकसान झाले आहे. याबाबत महाड महसूल विभागाने गावनिहाय पंचनामे सुरू केले असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 451 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे जनावरांच्या गोठ्यांनादेखील या वादळाचा फटका बसला असून 30 गोठ्यांची पडझड झाली आहे. महाड तालुक्यात विन्हेरे, बिरवाडी, किल्ले रायगड परिसर आदी भागात घरांवरील छपरे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोठेही जीवितहानी झालेली नाही.

खासगी मालमत्तांप्रमाणेच महाड तालुक्यात शासकीय मालमत्तेचेदेखील नुकसान झाले आहे. यामध्ये शासकीय कार्यालये, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आदींचा समावेश आहे. महाड तालुक्यात 18 प्राथमिक शाळांचे नुकसान झाले आहे, तर एक अंगणवाडी  वादळात सापडली. 17 इतर शासकीय कार्यालयेदेखील वादळात बाधित झाली आहेत.

या मालमत्ता नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाकडून सुरू आहेत. या वादळाचा तडाखा महावितरण विभागाला बसला असून महावितरण विभागाचे 24 पोलचे नुकसान झाले आहेत, तर एक ट्रान्सफॉर्मरदेखील नादुरुस्त झाला आहे.

आंबा उत्पादकही हवालदिल

या वादळाने हाताशी आलेला आंबादेखील हिरावून नेला आहे. कोकणात हापूस आंबा या वर्षी आधीच कमी प्रमाणात आला होता. यामुळे हापूसचे दर स्थिर राहिले होते. कोरोनामुळे हापूस विक्रीवर बंधने आली होती. ग्रामीण भागातदेखील रायवळी आंबा देखील कमी प्रमाणात आला आहे. त्यातच या वादळाने अल्प प्रमाणात आलेला हापूस आंबा गळून पडला आहे. काही दिवसांतच हे आंबे बाजारात येण्याची चिन्हे होती, मात्र या वादळाने आंबा उत्पादकाची निराशाच केली. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळात काही आंबा उत्पादकांच्या बागांचे मोठे नुकसान झाले होते. मोठ मोठे आम्रवृक्ष तुटून गेले होते. या नुकसानीतून सावरत असलेला आंबा उत्पादक पुन्हा आलेल्या संकटाने हतबल झाला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply