महाड ः प्रतिनिधी
महाड शहरातील वाढती गर्दी कमी करण्यासाठी बुधवारी (दि. 19) अखेर पोलिसांनी विनाकारण फिरणार्यांना शहरात येणारे तीन मार्ग पूर्णपणे बंद केले. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून, पोलीस प्रशासनाकडून हा एकच उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाड तालुक्यातील कोरोना वाढीचा दर हा इतर तालुक्यांच्या तुलनेने जास्त आहे. महाड शहरातील होणारी नागरिकांची प्रचंड गर्दी रोखण्यात पोलीस कमी पडत आहेत. सकाळी महाड बाजारपेठेला तर जत्रेचे स्वरूप येत आहेत. यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढत असून तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्यादेखील वाढत आहे. शहरात येणार्या अनावश्यक नागरिकांना रोखण्यासाठी पोलिसांनी आता महाड शहरात प्रवेश करणारे महाड-रायगड मार्ग, बीएसबुटाला हॉल मार्ग आणि पंचायत समिती मार्ग सिमेंटचे बॅरिकेटस लाऊन पूर्णपणे बंद केले आहेत. त्यामुळे रायगड विभागातील नागरिकांना आता महाड एसटी स्टॅण्डकडून यावे लागणार आहे, मात्र जोपर्यंत पोलीस शहरात येणार्या अनावश्यक लोकांना स्वतःहून अडवत नाहीत तोपर्यंत शहरातील ही गर्दी कमी होणार नाही.