अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सोगाव येथील आदिवासी वाडीवर मातीचा काही भाग कोसळला. सुदैवाने जीवितहानी टाळली. येथील आदिवासी कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. सोगाव येथील आदिवासींच्या घराच्या पाठीमागे 30 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास डोंगराची माती येऊन भिंतीवर धडकली. या डोंगरावर आरसीएफ कारखान्याला वीजपुरवठा करणारा टॉवर उभा केलेला आहे, त्यालासुद्धा धोका निर्माण झाला आहे. या आदिवासीवाडीत 15 कुटुंब आहेत, तर वाडीची लोकसंख्या 70 इतकी आहे. सध्या येथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिप्ती देशमुख यांनी मापगाव ग्रामसेवकासोबत घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सूचित थळे व त्यांचे सहकारी या आदिवासी कुटुंबासाठी भोजनाची व्यवस्था पाहत आहेत. ज्या आदिवासींच्या घराजवळ डोंगराच्या मातीचा ढिगारा आला आहे त्या ठिकाणी फक्त दोन वयोवृद्ध व्यक्ती राहतात. त्यांना त्वरित सुरक्षित स्थळी हलविले आहे, अन्य घरांना तसा धोका सध्यातरी नाही. तशीच परिस्थिती निर्माण झाली, तर मापगाव ग्रामपंचायतमार्फत सर्व बाधित आदिवासींची निवास आणि जेवणाची मराठी शाळा व धर्मशाळेत व्यवस्था केलेली आहे, अशी माहिती माजी सरपंच सुनील थळे यांनी दिली.