उरण ः प्रतिनिधी
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या वतीने 24 व 25 मे रोजी ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पहिले व्याख्यान प्राध्यापिका डॉ. प्राजक्ती वाघ भोसले (मानसशास्त्र विभागप्रमुख, राजश्री शाहू महाविद्यालय, औरंगाबाद) यांचे कोविड-19च्या काळातील मानसिक आरोग्य या विषयावर झाले. त्यांनी जागृत मन, मनावर नियंत्रण कसे ठेवावे, मेंदूला प्रशिक्षित कसे करावे व आनंदी कसे जगावे याविषयी मार्गदर्शन केले. दुसर्या व्याख्यानात प्रा. डॉ. प्रशांत लोखंडे (माहिती तंत्रज्ञान विभाग पिलई महाविद्यालय, पनवेल) यांनी सायबर क्राइम विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. सायबर गुन्हेगारांकडून आपण कसे फसले जातो, त्यासाठी आपण कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे व सुरक्षित राहिले पाहिजे याविषयी माहिती सांगितली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांनी या व्याख्यानमालेविषयीची महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी सकारात्मक जगले पाहिजे. मन सक्षम केले पाहिजे, असे सांगितले, तसेच फेसबुक, व्हॉट्सअॅप वापरताना व ऑनलाइन व्यवहार करताना कशी दक्षता बाळगली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. महिला विकास कक्षाच्या अध्यक्ष प्रा. अनुपमा कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून पाहुण्यांचा परिचय दिला, तर आभार प्रा. लिफटेन कुमारी व प्रा. मयुरी मढवी यांनी व्यक्त केले. व्याख्यानमालेल्या यशस्वितेसाठी प्रा. हन्नत शेख व महिला विकास कक्षाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.