उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील छावा प्रतिष्ठान चिरनेरच्या सदस्यांनी सोमवारी (दि. 24) चिरनेर येथील बापूजीदेव मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.
चिरनेरमधील बापूजीदेव मंदिर हे निसर्गरम्य परिसरात डौलदारपणे उभे असलेले मंदिर आहे. गावापासून दूर असलेल्या या मंदिरा सभोवताली छोटे छोटे डोंगर उभे आहेत. या मंदिर परिसरात सुटीच्या दिवशी व अनेकदा बरेच लोक विरंगूळ्याचे ठिकाण म्हणून येऊन देव दर्शनासोबत सहभोजनाचा आनंद घेत असतात. त्यामूळे या परिसरात अस्वच्छताही तेवढीच पसरते. ही गोष्ट लक्षात घेवून छावा प्रतिष्ठान चिरनेरच्या सदस्यांनी जाऊन हा परिसर स्वच्छ केला. तीन तास मेहनत घेऊन या परिसरात पसरलेल्या कागदी व प्लास्टिक डिश, पत्रावली, प्लास्टिक बाटल्या, काचेच्या बाटल्या, खाद्य पदार्थांची रिकामी पाकीटे असा अनेक प्रकारचा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.
या वेळी छावा प्रतिष्ठानचे सदस्य व भारतीय तोफखान्यातील निवृत्त सैनिक सचिन कडू, उपाध्यक्ष सुशिल म्हात्रे, कार्याध्यक्ष संतोष भोईर, सहसचिव सचिन केणी, सचिव धिरज केणी, ज्येष्ठ सदस्य रमेश कडू, योगेश केणी आदींनी सहभाग घेतला होता.