Breaking News

वृक्ष लागवड मोहिमेवर कोरोनाचा परिणाम

रोपांच्या संख्येत घट; यंदाचा लक्ष्यांक घसरला

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे यंदाच्या पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत किमान 200 झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाकरिता जिल्ह्यातील विविध रोपवाटिकांमध्ये रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, मात्र यंदा कोरोनामुळे नवीन रोपनिर्मितीवर परिणाम झाल्याने रोपांची कमतरता जाणवत आहे. 

पावसाळा सुरू झाला की शासनाच्या विविध विभागांमार्फत जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाते. वन विभाग, सामाजिक वनीकरण, राज्याचा कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग तसेच राज्य सरकारच्या अखत्यारितील विविध कार्यालये यात सक्रिय सहभाग नोंदवत असतात. राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संगोपन मोहीम राबवली जाते. अनेक सामाजिक आणि पर्यावरणप्रेमी संस्था आपापल्या परीने सहभाग नोंदवत शासनाच्या उपक्रमाला हातभार लावत असतात.

रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने यंदा वृक्ष लागवड मोहिमेची सज्जता ठेवली आहे. प्रत्येक गावच्या हद्दीत ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी परिसर, इतर सरकारी मोकळ्या जागा, समुद्रकिनारा या ठिकाणी वृक्ष लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदाच्या पावसाळ्यासाठी सुरुवातीला प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत किमान एक हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते, मात्र जिल्ह्यातील

रोपवाटिकांमध्ये रोपे आणि कलमांची कमतरता दिसून येत आहे. कोरोनामुळे रोपवाटिकांमध्ये कामगार पोहचू शकत नव्हते. त्यामुळे नवीन रोपे तयार करण्याचे काम बर्‍याच अंशी थांबले होते. परिणामी रोपे कमी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे उपलब्ध असलेल्या रोपांवरच वृक्ष लागवड मोहीम सीमित ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

रोपांची संख्या कमी असल्याने आता प्रत्येक ग्रामपंचायतीचे वृक्ष लागवडीचे लक्ष्य एक हजारांवरून 200पर्यंत घसरले आहे. आता प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान 200 फळझाडे लावण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने दिले आहे. या कामासाठी मनरेगा, 15वा वित्त आयोग, ग्रामपंचायत स्वनिधी,  सीएसआर निधी किंवा स्वयंसेवी संस्थांची मदत यातून खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. या वर्षी जिल्ह्यातील आठ फळ रोपवाटिकांमध्येही रोपे आणि कलमे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात आंबा, काजू, आवळा, चिंच, चिकू, कोकम या रोपांचा समावेश आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होऊन मोहीम यशस्वी करावी. रोपवाटिकांशी संपर्क साधून आवश्यक असलेली रोपे उपलब्ध करून घ्यावीत आणि लागवडीचा अहवाल सादर करावा.

-डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply