महाड : प्रतिनिधी
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणार्या संतोष कदम या प्राध्यापकाने आपल्या मागण्यांसाठी गुरूवारी
(दि. 19) दुपारी महाविद्यालयासमोर चक्क मुंबई – गोवा महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी प्रा. कदम यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, प्रा. कदम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना महाड ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राध्यापक संतोष कदम हे महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मार्च 2012 पासून तासिका तत्वावर काम करत असून ते अर्थशास्त्र विषय शिकवितात. ते 2016 पासून आपल्याला समान काम व समान वेतन या नियमानुसार वेतन मिळावे व कायम स्वरूपी नियुक्ती करावी, अशा मागण्या करीत आहेत. यासाठी त्यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणही केले होते. मात्र मागण्या मान्य न झाल्याने त्यांनी गुरूवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयासमोर मुंबई – गोवा महामार्गावर टायर पेटवून रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज गिरी हे आपल्या सहकारी कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी प्राध्यापक कदम यांना ताब्यात घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरु केली. आंदोलनादरम्यान प्राध्यापक कदम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना महाड ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कदम यांच्यावर मुंबई पोलीस ऍक्ट 110, 112,117 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.