Breaking News

माजी आमदार सुरेश लाड यांच्याविरोधात घोषणाबाजी

शिवसेनेचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

खोपोली ः प्रतिनिधी
कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून पेटला आहे. विद्यमान शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांच्यात शाब्दिक लढाई सुरू झाली असताना दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पाली फाटा येथे विद्यमान शिवसेना आमदार थोरवे यांचा निषेध व्यक्त केला होता, तर सोमवारी (दि. 31) त्यास प्रत्युत्तर देत शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत माजी आमदार लाड यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना-राष्ट्रवादी असा पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार असताना कर्जत-खालापूर मतदारसंघात मात्र प्रशासकीय कार्यक्रमांवरून शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस सुरू आहे. त्याचा प्रत्यय वारंवार दिसून येत आहे. सोमवारी खालापुरात पाली फाटा येथे झालेल्या निषेध आंदोलनात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, सल्लागार नवीन घाटवळ, गोविंद बैलमारे, महिला आघाडी जिल्हा संघटका रेखा ठाकरे, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विचारे, शहरप्रमुख सुनील पाटील, ज्येष्ठ नेते उल्हास भुर्के, खोपोलीच्या उपनगराध्यक्ष विनिता कांबळे-औटी, पं.स.सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष आघाडीत एक असताना कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात मात्र या दोन पक्षांमध्ये बिघाडी झाली आहे. आघाडीतील ही बिघाडी अशीच कायम राहिल्यास येत्या निवडणुकांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीतील संघर्ष वाढेल, अशी शक्यता आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply