Breaking News

पुणे तिथे सर्वच उणे

जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारतीय मतदान प्रक्रियेकडे लोकतंत्र मानणारे देश पाहतात. अभ्यासही केला जातो. हिंदुस्थानच्या पंतप्रधान निवडीसाठी अद्यापपर्यंत तीन टप्प्यांत मतदान घेण्यात आले. चौथा टप्पा येत्या 29 एप्रिल रोजी पार पडणार आहे. देशात 117 ठिकाणी झालेल्या मतदानात 64 टक्के, तर राज्यात 14 ठिकाणी झालेल्या मतदानात 61.30 टक्के मतदान झाले. तेही शांततेत झाले आणि हाच या लोकशाहीचा मोठा विजय आहे. जगाने आदर्श घ्यावा अशी लोकशाही देशात दिवसेंदिवस बहरास येत आहे. खेड्यांपासून दुर्गम भागातील पाड्यांपर्यंत लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदार मतदान केंद्रावर जात आहेत.

विशेष म्हणजे सातासमुद्रापार राहणार्‍या  दुबई येथून एक वर्षाच्या तान्हुल्या बाळासह सायली सीताराम तोंडेपाटील-मोरे या राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी पुण्यात दाखल होत मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे विशेष कौतुक झाले पाहिजे. अनेकांनी विवाह बंधनात गुंतत असताना सात फेरे मारण्याअगोदर मतदान केंद्र गाठले. काहींनी रोजच्या धावपळीच्या जीवनातून, काहींनी प्रकृतीची तमा न बाळगता, उन्हाचे चटके सोसत मतदानाचा हक्क बजावला. रायगडातील गंगूबाई चव्हाण (110), सुलोचना गोविंद देशमुख (107), जखमी निवृत्त शिक्षिका आशालता काकडे, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी व्हीलचेअरचा आधार घेत मतदान केले. जिल्हाधिकारी ते सामान्यातील सामान्य मोलमजुरानेही मतदान केले, तर सर्वांत सुशिक्षित असणारे, विद्येचे माहेरघर, आयटी पार्क तसेच काही वर्षाृंत झपाट्याने झालेला विकास व जमिनीला आलेला  सोन्याचा  भाव या कारणाने ऐतिहासिक पुणे शहर राज्यातच नव्हे तर देशात महानगर म्हणून उदयास आले आहे.

देशाच्या कानाकोपर्‍यातून जम्मू-काश्मीरपासून शिक्षणासाठी व उद्योग रोजगारासाठी तरुण-तरुणी पुण्यात दाखल होत आहेत. याच पुण्यातील  लोकशाहीसाठी 51 टक्के मतदारांना  मतदान करण्याची  तसदी घ्यावीशी वाटली नाही याची खंत देशाभिमानी जनतेला आहे. तब्बल निम्म्याहून अधिक मतदारांनी शासकीय रजा झोपण्यात घालवावी यासारखे दुर्दैव नाही. कदाचित निवडणुकीत चुरस नसेल, लग्नसराई वा खासगी घरगुती कार्यक्रम असतील, वाढलेले तापमान असेल अथवा राजकीय पक्ष वा पुढार्‍यांची विश्वासार्हता हरवली असेल. असे काहीही कारण असले तरीही देशाच्या सांकृतिक शहराच्या जागरूक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावू नये याला काय म्हणावे. फक्त 49.14 टक्केच  मतदार मतदानासाठी उतरले. हे विद्वान तसेच शहाण्या पुणेकरांना शोभणारे वर्तन नाही. देशात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये 79.67 टक्के झाले. महाराष्ट्रात 61. 30 टक्क्यांपैकी पुण्यात सर्वांत निचांकी मतदान नोंदवले  गेले. काश्मीरमध्ये दहशतीच्या सावटाखाली 13.61 टक्के मतदान झाले. सन 2014च्या निवडणुकीत पुणे मतदारसंघातील कसबा पेठ, कोथरूड, वडगाव शेरी, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोमेंट अशा सहा विधानसभा मतदारसंघांत मोठे मतदान झाले होते. ते 2019मध्ये घसरलेले पाहावयास मिळते. पुणे कॅन्टोमेंट येथे झालेले मतदान

2019मध्ये तब्बल तीन टक्के घसरले आहे. 2014मध्ये ते 48.79 टक्के होते. शिवाजीनगरमध्ये सात टक्क्यांनी मतदान खाली आले. पर्वतीमध्ये 52. 07 टक्के मतदान झाले. ते मागच्या तुलनेत दोन टक्के कमी आहे. कसबा पेठेत 55.88 टक्के मतदान झाले असले तरी ते मागच्या तुलनेत सात टक्के घसरले आहे. कोथरूडमध्ये 50 टक्के मतदान झाले. ते मागच्या निवडणुकीपेक्षा पाच टक्क्यांनी कमी आहे. वडगाव शेरीत मागच्या निवडणुकीपेक्षा चार टक्के मतदान घटले आहे. 2014च्या निवडणुकीत भाजपच्या अनिल शिरोळे यांना पाच लाख 69 हजार 825 मते, काँग्रेसचे डॉ. विश्वजित कदम यांना दोन लाख 53 हजार 949, तर मनसेच्या दीपक पायगुडे यांना 93 हजार 449 मते मिळाली होती. तब्बल सहा हजार 436 मतदारांनी यापैकी कोणीही नाही अशी नकारघंटा बजावत नोटावर मतदान केले होते. या मतदारसंघाचे नेतृत्व 1951 साली नरहर गाडगीळ पुणे मध्य व इंदिरा अनंत मेयदेव, 1957 नारायण गणेश गोरे, 1962 शंकरराव मोरे, 1967 एस. एम. जोशी, 1971 व 1977 मोहन धारिया, 1980, 84 व 89 विठ्ठलराव गाडगीळ, 1991 आण्णा जोशी, 1996 सुरेश कलमाडी, 1998 विठ्ठल तुपे, 1999 प्रदीप रावत, 2004 व 2009 सुरेश कलमाडी, तर 2014मध्ये भाजपच्या अनिल शिरोळे यांनी बाजी मारली आहे. या मतदारसंघात बहुतांशी काँग्रेसनेच बाजी मारल्याचे चित्र आहे. सुशिक्षित मतदारसंघात घटलेले मतदान चिंतेची बाब आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पथनाट्य, मतदार जागृतीची विविध साधने वापरूनही पुण्यासारख्या सधन महानगरात, विद्येच्या माहेरघरात 51 टक्के मतदारांनी लोकशाहीकडेच कानाडोळा केला, हे वर्तन बरे नव्हे. जे शहर समाजसुधारक, ऐतिहासिक वारसा, सुरक्षित शहर, ज्ञानी हुशार लोकांचे  वास्तव्य हा टेंभा मिरवते ते पुणे मतदानात उणे ठरले. पुण्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान यावरून हे सिध्द होतंय की पुण्याचे लोक फक्त पाट्या लावण्यात आणि टोमणे मारण्यातच पटाईत आहेत, अशी खिल्ली सोशल मीडियावर उडवली जात आहे. पुणे तिथे देशाच्या लोकशाहीचे उणे असल्याचा प्रत्यय देशाने घेतला आहे.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर लोकशाही बळकट व्हावी,  मतदार जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी महामतदार जागृती अभियान पुणे, मुंबई, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, सातारा, औरंगाबाद, धुळे, जळगाव व कल्याण येथे हिरवा कंदील दिला. 2014पेक्षा 2019च्या निवडणुकीत 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान व्हावे हा हेतू ठेवण्यात आला होता, तर लोकसंगीत, हवेत फुगे सोडून मतदारांमध्ये जागृती करण्याचे काम केले. होय, मी मतदान करणार, अशा आशयाचा फलक कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर लावण्यात आला होता. निवडणुकीच्या कामात केंद्र शासन लाखो-करोडो रुपये कोणतेही ऑडिट व तपासणी न करता खर्च करते. हा जनतेचा खर्च होतो, मात्र पुण्यात 51 टक्के लोक मतदानच करीत नाहीत. याला काय म्हणावे.  देशात 1952 साली 44.9 टक्के मतदान, 1957मध्ये 45. 4 टक्के, 1962-55.4 टक्के, 1967-61.10 टक्के, 1971-55.3 टक्के, 1977-60.5 टक्के, 1980 -56.9 टक्के, 1984-64.1 टक्के, 1989-62.टक्के, 1991-55.9 टक्के, 1996- 57.9 टक्के, 1998-62 टक्के, 1999-60 टक्के, 2004-58.1 टक्के, 2009मध्ये 58.2 टक्के, तर 2014 साली सर्वांत जास्त म्हणजे 66.4 टक्के मतदान देशात झाले होते. देशात सक्तीचे मतदान करा, असाही एक प्रवाह आहे, तर मतदान न करणार्‍याच्या खात्यातून 350 रुपये वजा होतील, असा फेक मेसेज सोशल मीडियावर झळकत होता. याची तमा पुणेकरांनी बाळगली नाही. पुणे व

रायगडमध्ये एकाच दिवशी मतदान घेण्यात आले. रायगड मतदारसंघात 61.77 टक्के मतदान झाले. मतदार याद्या अचूक आणि परिपूर्ण तसेच मतदारांना मतदानाविषयी ओळखपत्रासंदर्भात  माहिती दिल्याने जिल्ह्यात कुठेही मतदारांत संभ्रमाचे वातावरण नव्हते. पेण तालुक्यात 65.17 टक्के, अलिबागमध्ये 64. 89 टक्के असे सर्वाधिक मतदान झाले. यापाठोपाठ दापोली 61.56 टक्के, श्रीवर्धन  59.59 टक्के, गुहागर 59.19 टक्के, तर महाड 59.31 टक्के असे मतदान झाले. रायगड मतदारसंघात 16 लाख 51 हजार 560 मतदारांपैकी 8 लाख 9 हजार 343 पुरुष मतदारांपैकी 5 लाख 4 हजार 998 जणांनी मतदान केले (62.40%), तर 8 लाख 42 हजार 214 महिला मतदारांपैकी 5 लाख 15 हजार 187 म्हणजे 61.17 टक्के महिलांनी मतदान केले. मतदार याद्या अचूक आणि परिपूर्ण असण्यावर निवडणूक आयोगाने भर दिला होता. मतदारांना सर्व प्रकारचे अर्जांचे नमुने वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आले होते, तसेच मतदार अधिकारी व कर्मचार्‍यांनी वेळच्या वेळी अर्ज भरून घेऊन ते अद्ययावत  केल्याने मतदानाच्या दिवशी कुठल्याही तक्रारी आल्या नाहीत किंवा यादीत नाव नसल्यावरून, चुका असल्यावरून गोंधळ झाला नाही.   मतदान प्रक्रियेतील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी अधिकारी व कर्मचार्‍यांचे सातत्याने प्रशिक्षण विविध स्तरांवर सुरू होते. त्याचा लाभ प्रत्यक्ष मतदानात झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे. 29 तारखेला चौथ्या टप्प्यात होणार्‍या मावळ म्हणजे अर्धे पुणे व अर्धे रायगड मतदारसंघात आपला प्रतिनिधी निवडला जाईल. त्या निवडणुकीत पुण्याची कसर मावळमधील मतदार भरून काढतील यात शंका नाही. ते एक लोकशाही बळकट करण्याचे पवित्र काम ठरेल.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply