Breaking News

भेटीगाठींचे भय

राजकीय मतभेद असले तरीही व्यक्तिगत संबंधांमध्ये बाधा येता कामा नये ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासूनच अशा प्रकारचे परस्पर सौहार्द महाराष्ट्रातील बहुतेक राजकीय पक्षांनी प्रयत्नपूर्वक टिकवले आहे. समाजमाध्यमांवरील काही अतिरेकी मंडळींमुळे साध्यासुध्या भेटीगाठींनादेखील अकारण राजकीय रंग चढतो. दुर्दैवाने महाविकास आघाडीतील दुसर्‍या व तिसर्‍या फळीतील नेते अशा भेटीगाठींमुळे गडबडून जातात असे दिसते. एखाद्याच्या मनात काळेबेरे असले किंवा थोडिशी जरी अपराधी भावना असली तरी त्या व्यक्तीची नजरदेखील चोरट्यासारखी होऊन जाते. महाविकास आघाडी सरकारचा नूर सुरुवातीपासूनच काहिसा तसाच राहिला आहे. विरोधी पक्षनेते किंवा भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेता कोणालाही भेटला तरी महाविकास आघाडीमध्ये लागलीच खळबळ माजते. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची विशेष नजर असते. दोन-तीन दिवसांपूर्वी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते व महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. स्वत: फडणवीस यांनीच ट्विट करून या भेटीची माहिती जाहीर केली. त्यामुळे या भेटीत गुप्तता अशी काही नव्हती. गेले काही दिवस शरद पवार यांची प्रकृती ठीक नव्हती व त्यांच्यावर काही शस्त्रक्रियादेखील झाल्याचे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस स्वत: पवार यांच्या घरी सिल्व्हर ओक येथे गेले. दुसर्‍याच दिवशी त्यांनी जळगाव येथे भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या घरी भेट दिली. रक्षा खडसे भाजपच्या खासदार आहेत आणि त्यांचे सासरे एकनाथ खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. लगोलग खडसे यांनी सिल्व्हर ओक येथेच त्यांचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. भेटीगाठींचा हा सिलसिला लागोपाठ दोन-तीन दिवस चालू राहिल्यामुळे महाविकास आघाडी जणु पार हादरून गेली. खरेतर या भेटीगाठींमध्ये राजकारण शोधण्याचे काहीही कारण नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असोत किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील असोत, विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी कुणाचीही भेट घेतली तरीही सत्ताधारी आघाडीला हादरे बसावेत याचा अर्थ काय होतो? देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीला जाऊन पंतप्रधान अथवा गृहमंत्र्यांना भेटले तरीही राज्यातील सत्ताधार्‍यांची चलबिचल होते. त्यांनी माननीय राज्यपालांची भेट घेतली तरी राज्यकर्त्यांच्या खुर्च्या जणु डळमळू लागतात. हे सारे घडते ते सत्ताधार्‍यांच्या मनात असलेल्या अपराध भावनेमुळे. महाविकास आघाडीची सत्ता येऊन आता दीड वर्ष झाले आहे. या दीड वर्षामध्ये जनतेच्या भल्याचे एकही सांगण्याजोगे काम या सरकारला करून दाखवता आलेले नाही. पोकळ घोषणा आणि भावनेला हात घालणारी निरर्थक भाषणे याच्या पलिकडे मराठी जनतेच्या हाती काहीही लागलेले नाही. फडणवीस यांनी सिल्व्हर ओकला भेट दिली, त्याचे पडसाद अजुनही महाराष्ट्राच्या राजकारणात उमटत आहेत. अशाच प्रकारे एक दिवस फडणवीस मातोश्रीवरदेखील पायधूळ झाडतील, अशी अपेक्षा काही शिवसेना नेते व्यक्त करत आहेत. त्यास स्वत: देवेंद्र फडणवीस तसेच अन्य काही भाजप नेत्यांनी समर्पक उत्तरही दिले आहे. ते तितकेसे सोपे नाही हे राजकीय वर्तुळातील जाणकार जाणतातच.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply