Breaking News

मानवी साखळी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार

आगरी, कोळी, भंडारी समाज संघटनांचा निर्धार

मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईतील सर्व आगरी, कोळी, भंडारी समाज संघटनांच्या प्रतिनिधींची सभा शनिवारी (दि. 5) वडाळा येथे झाली. या सभेत उपस्थित सर्वांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी येत्या 10 तारखेला होणार्‍या मानवी साखळी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला.
या सभेस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष तथा पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, समितीचे सदस्य तथा उरणचे लोकप्रिय आमदार महेश बालदी, सरचिटणीस दीपक म्हात्रे, नगरसेवक विकास घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
या सभेत मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या कार्याचा आढावा घेत, त्यांचे नेतृत्व महाराष्ट्रात सर्वमान्य होते, असे सांगितले. प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी आणि ओबीसी जनतेसाठी त्यांनी आपले संबंध आयुष्य वेचले. अशा या निस्वार्थी नेत्याचे नाव त्यांच्या कर्मभूमीत होत असलेल्या विमानतळाला देणे योग्यच आहे. त्यामुळे यासाठी मुंबईतही आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्याकरिता सर्वांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार महेश बालदी यांनीही या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करून दि. बा. पाटील यांच्या नावासाठी सर्व जनता जागृत होत आहे. राज्य सरकारने याचा विचार केला पाहिजे, असे म्हटले.
ज्येष्ठ पत्रकार आणि कृती समितीचे सरचिटणीस दीपक म्हात्रे यांनी दि. बा. पाटील यांची महती सांगून या निमित्ताने जिल्ह्या-जिल्ह्यात जी जागृती होत आहे ती महत्त्वाची आहे. हे आंदोलन म्हणजे आपल्या एकजुटीचे प्रतीक असून ते शासनाला दाखवून द्यायचे आहे, असे सांगितले.
माजी नगरसेवक रघुनाथ थवई, श्री. अल्मेडा, मच्छीमार संघटनेचे श्री. घनू, भालचंद्र थळे, राजेश गायकर, रमेश भोईर, भारती कडू, सायन कोळीवाडा येथील श्री. केणी, आगरी समाज विकास संघाचे धीरज कालेकर, जयेश आकरे, जितेंद्र म्हात्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या सभेत, दादर टीटी ते सायन आणि चुनाभट्टी ते मानखुर्द अशा मुख्य मार्गावर मानव साखळी उभारण्याचा निर्धार करण्यात आला. सभेला महिलांची संख्याही मोठी होती.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply