Breaking News

दि. बा. पाटील यांच्या नावासाठी कृती समितीचा मुंबईतही एल्गार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी, ओबीसी जनता सुरुवातीपासून करीत आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 जून रोजी ठिकठिकाणी मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी सोमवारी (दि. 7) मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, समितीचे कार्याध्यक्ष तथा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, कृती समितीचे सहचिटणीस दीपक म्हात्रे, खजिनदार जे. डी. तांडेल, गुलाबराव वझे, पनवेलचे उपमहापौर व आरपीआयचे कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड, भाजपचे युवा नेते दशरथ म्हात्रे, कृती समितीचे उरण विभाग संयोजक विनोद म्हात्रे, मेघनाथ म्हात्रे, नंदेश ठाकूर, संजय ठाकूर आदी उपस्थित होते.
याविषयी सविस्तर माहिती देताना दशरथ पाटील यांनी सांगितले की, लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आली आहे. तरीदेखील अचानकपणे 17 एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, मुंबई या विभागातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी अशा समाजातील सर्व जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हे सारे प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक व राजकीय संघटनांनी येत्या 10 जून रोजी भव्य मानवी साखळी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात 25 ते 30 हजार लोकांचा सहभाग असणार असून तशी तयारी झाली आहे.राज्य सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. त्या अनुषंगाने 24 जूनला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी सिडको भवनाला भव्य आंदोलनातून घेराव घालण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बहुजनांच्या हितासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांनी स्वतःचे आयुष्य खर्च केले. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला द्यावे, अशी सर्व समाजांतील लोकांचीही मागणी आहे. जासई येथे झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्या वेळी दि. बा. पाटील यांच्या नावासाठी मागणी आणि त्या अनुषंगाने लढा देण्याचे ठरले.
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील प्रमुखांना  पत्रव्यवहार केला आणि पाठपुरावाही सुरू झाला, मात्र त्यांचा कुठलाही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे दि. बा. पाटील यांनी दिलेल्या ’संघर्षाशिवाय काही मिळत नसते’ या वचनाप्रमाणे सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे दशरथ पाटील यांनी अधोरेखित केले. या संदर्भात आमची सरकारकडे मागणी तसेच मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलवणे आणि त्यात चर्चा होणे आवश्यक आहे. उद्या प्रश्न वादग्रस्त होण्यापूर्वी तो शांततेने सुटावा यासाठी मुख्यमंत्री व मंत्रीमहोदयांना पत्रव्यवहार केला आहे, पण ‘दिबां’चे नाव विमानतळाला देण्यात यावे ही आमची मागणी आहे, याचाही त्यांनी पुनरूच्चार केला.
लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, 2 जानेवारी 2015 रोजी खासदार कपिल पाटील यांनी लोकभावनेचा विचार करून लोकसभेत दि. बा. पाटील यांच्या नावाची मागणी केली. त्या संबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष व सध्याच्या मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला असता, त्यांनी तो तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 19 जून 2018 रोजी पाठविला. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा तो प्रस्ताव उचित कार्यवाही करण्याच्या सूचनेसह प्रधान सचिव (विमानचालन) यांच्याकडे पाठविला होता. तसे 7 जुलै 2018 रोजी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी लेखी कळविलेही होते तसेच स्थानिक दहा गाव विमानतळ प्रकल्पबाधित संघटनेच्या वतीने व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सिडकोकडेही मागणी करण्यात आली होती, पण ही लोकभावना लक्षात न घेता सिडकोने आता जी कृती केली आहे त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांमध्ये सिडकोविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दि. बा. पाटील साहेबांमुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला, त्यांनी संघर्ष केला नसता तर येथील प्रकल्पग्रस्त, शेतकरी, स्थानिक, नागरिकांच्या पदरी काहीही पडले नसते. ‘दिबां’मुळे परिसराचा विकास झाला व ते सर्वांचे आधारस्तंभ राहिले आहेत. साडेबारा आणि साडेबावीस टक्के भूखंडांचा निर्णयही त्यांच्या संघर्षातून निर्माण झाला आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने प्रकल्पग्रस्त गावांमध्ये वैभव पहायला मिळते. हे ध्यानात घेता नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे ही 95 टक्के लोकांची मागणी आहे आणि त्याप्रमाणे विविध ग्रामपंचायतींनी, गावांनी ठरावसुद्धा केला आहे, अशी माहिती देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, दि. बा. पाटील हयात असताना प्रकल्पग्रस्तांच्या 50 टक्के मागण्या पूर्ण झाल्या आहेत, पण आजही 50 टक्के मागण्या प्रलंबित आहे. नामकरणाबरोबरच प्रलंबित मागण्या पूर्ण करणे ही कृती समितीची भूमिका आहे. सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सूचित केले होते. त्या वेळी त्या विभागातील खासदार विनायक राऊत यांनी विमानतळ व्हायला एक-दोन वर्षे वेळ आहे, असे सांगितले. मग नवी मुंबई विमानतळ पूर्ण व्हायला चार वर्षे लागतील. असे असतानाही तिकडे वेगळे इकडे वेगळे ही काय भूमिका आहे. जनता सुज्ञ आहे. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षांचे नेते करीत आले आहेत. कारण दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. येथील भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘दिबां’नी आपले संबंध आयुष्य वेचले आहे. 1984 साली शेतकर्‍यांच्या जमितीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व देशभर गाजलेल्या शौर्यशाली लढ्यातून शेतकर्‍यांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याचे तत्व जे प्रस्थापित झाले ते पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना लागू झाले. त्यामुळे दि. बा. पाटील हे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते होत. या वेळी त्यांनी 10 जूनच्या मानवी साखळी आंदोलनात रायगड ते मुंबईपर्यंत विविध पक्षांतील कार्यकर्ते, संस्था, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असेही सांगितले.
आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी भूमिका मांडली असून पाठिंबा दिला आहे. त्या अनुषंगाने या आंदोलनात आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असे उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी स्पष्ट केले, तर संतोष केणे, गुलाबराव वझे यांनीही बोलताना मानवी साखळीसाठी त्यांच्या विभागात जोरदार तयारी झाल्याचे सांगितले.
आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्र विधिमंडळात तसेच खासदार म्हणून दिल्लीच्या सार्वभौम संसदेत शेतकर्‍यांचे, कष्टकर्‍यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न दि. बा. पाटील यांनी पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न अशा अनेक जनलढ्यात हिरीरीने भाग घेऊन तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरावे यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागरूक राहावी यासाठी नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी विविध पक्षांच्या नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी तसेच प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे. राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply