Breaking News

शेअर बाजारात तेजी असताना घ्यावयाची काळजी

शेअर बाजारात तेजी असताना त्याचा बोलबाला सुरु होतो आणि त्यात अनेक नवे गुंतवणूकदार अडकतात. सध्या बाजारात अशीच तेजी असून एक कोटींच्यावर गुंतवणूकदार बाजारात आले आहेत. शेअर बाजारात आज अनेक कारणांनी परतावा मिळत असला तरी तो टिकवून ठेवण्यासाठी काळजी ही घ्यावीच लागते.
सध्या शेअर बाजार तेजीत आहे. आज ना उद्या, तो कोसळेल अशी अनेकांची अटकळ होती, पण तसे काही झाले नाही. नजीकच्या भविष्यात कोरोना साथीचा परिणाम म्हणून अर्थ व्यवस्थेला फटका बसला आहे, पण त्याचे सर्व परिणाम अजून बाहेर आलेले नाहीत. ते येतील तेव्हा अशीच तेजी राहील, याची खात्री देता येणार नाही. असे असले तरी भारतीय शेअर बाजारातील गेल्या वर्षभराच्या तेजीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे अशा तेजीत काय करावे, याचा एक संभ्रम गुंतवणूकदारांमध्ये निर्माण होतो आहे. त्या पार्श्वभूमीवर या काळात कोणत्या चुका होऊ शकतात आणि त्या कशा टाळाव्यात, ते आपण पाहू.
शेअर बाजारात चांगला परतावा मिळवल्याची अनेक उदाहरणे आपण ऐकतो, पाहतो तसेच शेअर बाजारात हात पोळून घेतलेलीदेखील अनेक उदाहरणे असतात. अर्थात स्वतःचे हात पोळल्याचे सांगणारे खूपच कमी असतात. शेअर बाजारात हुकमी यश मिळवण्याच्या कुठलाही फॉर्म्युला नाही. त्यामुळे शेअर ट्रेडिंग करून रोज दहा हजार कमवा असे सांगणारे नेहमीच रोज दहा हजार कमावण्याऐवजी दुसर्‍यांना ट्रेडिंगचे प्रशिक्षण देऊन पैसा कमावत असतात ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
1) अचूक अंदाज येणे अशक्य – नवखा गुंतवणूकदार नेहमीच जास्तीत जास्त नफा मिळण्याच्या उद्देशाने शक्य तितक्या कमी भावात घेऊन नंतर चढ्या भावात विकण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच शेअर बाजारातील परिस्थितीचा
अंदाज म्हणजे निष्फळ प्रयत्न असतात. अगदी आयुष्य घालवलेल्या भल्याभल्या ट्रेडर्सना अचूक अंदाज येत नाही. त्यामुळे अचूक वेळ साधण्याच्या नादात कष्टाचा पैसा वार्‍यावर उडवू नका.
तुम्ही कंपनीचा ताळेबंद, नफा, कर्ज, कंपनीच्या व्यवसायाचे भवितव्य आदी गोष्टींचा अभ्यास करून विशिष्ट कंपनीत गुंतवणूक केली तर बाजारात काहीही होवो, त्या शेअरची किंमत कशी कमी-जास्त होते याचा तुम्हांला काळाच्या ओघात अंदाज येत जातो. शेअर बाजार अनेक गोष्टींमुळे हेलकावे खात पुढे जात असतो. त्यामुळे बाकीच्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुमचे उद्दीष्ट निश्चित करून त्यानुसार कंपनी निवडून गुंतवणूक करणे योग्य ठरते.  
2) ट्रेडिंगच्या नादी लागू नका – ट्रेडिंग आणि गुंतवणूक या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. ट्रेडर हा नेहमीच कमी कालावधीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याउलट गुंतवणूकदार दीर्घकाळात चांगल्या परताव्याच्या आधारे संपत्ती निर्मितीचे उद्दीष्ट ठेवून गुंतवणूक करत असतो. ट्रेडिंगसाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. अभ्यास आणि संशोधन करावे लागते. त्याच बरोबर अनुभव आणि त्यासंदर्भातील तज्ज्ञांची गरज भासते. ट्रेडिंग ही पूर्णवेळ करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे कुणी कितीही भरीला घातले तरी सामान्य गुंतवणूकदारांनी ट्रेडिंगच्या नादी लागू नये. अनेकदा ब्रोकरेज कंपनीत ऑर्डर मार्गी लावण्याचे काम करणारे एक्झिक्युटिव्ह फोन करून गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करण्यास भाग पाडतात. एखाद्या वेळेस सुरवातीचे एक-दोन दिवस बरा प्रॉफिट होतो आणि तिसर्‍या दिवशी जबरदस्त मार बसतो. त्यामुळे दुसर्‍यावर विसंबून आणि कुणीतरी सांगितलेल्या टीपवरून कधीही प्रयोग करू नयेत. बहुतेकवेळा असे प्रयोग फसण्याचीच शक्यता अधिक असते.
3) कळपात सामील होऊ नका – तेजीच्या वातावरणात कथित भारी शेअरच्या टिपचा संसर्ग वेगाने सगळीकडे पसरतो. अनेकदा अमक्याने एका दिवसात दोन-चार लाख रुपये कसे कमावले याच्या सुरस कथा तुम्ही ऐकलेल्या
असतात. बहुतेक वेळा टिप मिळालेले हे शेअर मध्यम किंवा छोट्या कंपन्यांचे असतात. तेजीच्या वातावरणात त्यांचा भाव वधारतो. परंतु मुळात त्या कंपन्यांची स्थिती भक्कम असेलच असे छातीठोकपणे सांगता येत नसते. या कंपन्यांचा ताळेबंद, कर्ज, लाभांश, प्रगती याची ठोस आकडेवारी उपलब्ध असतेच असे नाही. अनेकदा अशा कंपन्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि तुम्ही त्या कंपनीचा शेअर खरेदी केल्यावर तो घसरणीला लागतो. तो इतका घसरतो की तुम्ही केलेली गुंतवणूक शून्याच्या आसपास येऊन ठेपते. त्यामुळे  अशा ऐकीव टिपनुसार गुंतवणूक म्हणजे अंधारात लक्ष्यभेद करण्यासारखे असते. अशी थेट जोखिम घेण्याऐवजी म्युच्युअल फंडातील मिडकॅप योजनांमध्ये गुंतवणूक करणे, शहाणपणाचे ठरते.
4) इक्विटीत विविधता ठेवा – एकदम परिसस्पर्श व्हावा आणि आपण घेतलेला शेअर रोज वर चढत जावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. प्रत्यक्षात तसे कधीच होत नसते. दीर्घकालिन गुंतवणूक ही एक कला आहे. आणि भक्कम आर्थिक स्थिती असलेल्या आणि उत्तम व्यावसायिक भवितव्य असलेल्या कंपन्या निवडणे आणि त्या कंपन्यांचे शेअऱ दर महिन्याला खरेदी करत राहणे यातूनच संपत्ती निर्मिती होत असते. असे करत असताना आरोग्य, ऑटो, आयटी, पेन्ट, बँकिंग अशा विविध क्षेत्रातील सात ते आठ उत्तम कंपन्यांचे शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणे आवश्यक आहे. त्यातून विशिष्ट क्षेत्रातील मंदी किंवा प्रतिकूल स्थितीवर मात करून सरासरी तुमचा पोर्टफोलिओ फायद्यात राहणे आणि तो फायदा हळूहळू वाढत राहणे शक्य होते.
5) एसआयपी बंद करू नका – अगदी तेजीच्या वातावरणातही काही क्षेत्रात किंवा वर्गवारीत अनिश्चितता आणि मंदी असू शकते. अशा स्थितीत चालू असलेली एसआयपी थांबवून तो पैसा अन्यत्र तेजीच्या शेअरमध्ये वळवावा, असा मोह गुंतवणूकदाराला होतो. दुसरीकडे मंदीच्या बाजारात
तो तोटा सहन करून एसआयपीतून माघार घेतो. एकंदरीत बाजारात कशीही स्थिती असली तरी एखाद्या एसआयपीतील तुमच्या गुंतवणुकीचे विश्लेषण करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी दिला पाहिजे. बाजारातील चढ-उतारावर कधीही एसआयपीबाबत निर्णय घेऊ नका. कारण एसआयपीचे यश सरासरी आणि चक्रवाढीत असते. मंदीच्या काळात तुम्हांला त्याच पैशात अधिक युनिट मिळतात तर तेजीच्या काळात कमी युनिट मिळाली तरी एनएव्ही वाढलेली असते. अगदी चांगली कामगिरी करणार्‍या शेअरची तुलना करताना दीर्घकाळात एसआयपी चांगला परतावा देते.
दीर्घकालिन यशासाठी भावना बाजूला ठेवा, विशेषतः भिती आणि हाव. संयम बाळगा आणि शिस्तबद्ध रितीने गुंतवणूक करत रहा. नियमितपणे पोर्टफोलिओवर लक्ष ठेवा.

  • संदीप भूशेट्टी
    sbhushetty@gmail.com

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply