पेण : प्रतिनिधी
लर्निंग लायसन्ससाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. घरीच ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. या लायसन्सची ऑनलाइन प्रिंट काढता येणार असल्याने शिकाऊ चालकांची आता एजंटच्या विळख्यातून सुटका तर होणार आहेच, शिवाय खर्च आणि वेळदेखील वाचणार आहे. आजच्या घडीला अनेकजण वाहने चालवतात. मात्र, काहीजणांकडे लायसन्स नाहीत. लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात अनेक फेर्या मारणे, एजंटला हाताशी धरणे यामध्ये अनेक नव शिकाऊ वाहनचालक लर्निंग लायसन्स काढण्याकडे दुर्लक्ष करतात. आता या शिकाऊ वाहनचालकांची होणारी दमछाक थांबणार आहे. शिकाऊ परवान्याकरिता अर्जदाराला परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करताना आपले नाव, पत्ता, स्वाक्षरी याबरोबरच आपला आधार क्रमांक नोंदणी करायचा आहे. अर्जदाराच्या ओळखीची व पत्त्याची वेगळी खातरजमा करावी लागणार नाही तसेच चाचणीसाठी कार्यालयात न येता रस्ता सुरक्षाविषयी व्हिडिओद्वारे घरबसल्या शिकाऊ परवान्याची चाचणी देता येईल. प्रश्नांची 60 टक्के अचूक उत्तरे देणार्या अर्जदाराला शिकाऊ परवान्याची प्रत दिली जाईल. अर्जदाराला वैद्यकीय प्रमाणपत्रही डॉक्टरांमार्फत ऑनलाइन दिले जाईल. नवीन दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी मोटार वाहन निरीक्षकांतर्फे वाहन तपासणी केली जाणार नाही. अधिकृत विक्रेत्याने शुल्क व कर भरल्यानंतर नोंदणी क्रमांक दिला जाईल.
परिवहन विभागाच्या या नवीन परिपत्रकामुळे वितरक आणि नागरिकांचा वेळ वाचणार आहे. चांगल्या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच वितरकांना कशाप्रकारे काम करावयाचे आहे व आमचे कामकाज याबाबत संगणक प्रणालीमध्ये बदल होणार असून याबाबत अजून सूचना आलेल्या नाहीत.
– ऊर्मिला पवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण, जि. रायगड